अभिजित पोते, पुणे | 22 ऑगस्ट 2023 : पुणे शहर दहशवाद्यांच्या रडारवर आहे. पुण्यात दोन दहशवादी सापडल्यानंतर दहशतवाद्यांची एक साखळीच कार्यरत असल्याचे वक्तव्य पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले होते. शहरातील गुन्हेगारी वाढली आहे. कोयता गँग अधूनमधून सक्रीय होते. गुन्हेगारीच्या विषयावर विरोधकांनी टीकाही केली. त्यानंतर पोलिसांनी धडक कारवाई सुरु केल्या. अनेकांना तडीपार केले. मोकोकासारखी कारवाई केली. वारंवार कोम्बिंग ऑपरेशन राबवले. गुन्हेगारी मोडण्यासाठी पोलिसांचे जोरदार प्रयत्न सुरु असताना पुणे शहरात मिळणारे अंमलीपदार्थ हा चिंतेचा विषय झाला आहे. पुण्यात पुण्यात पुन्हा मोठा ड्रग्सचा मोठा साठा मिळाला आहे.
पुणे पोलिसांनी सुमारे 1 कोटी रुपयांचा आफिम जप्त केले आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई करत तीन जणांना अटक केली आहे. राजस्थानची टोळीकडून पुणे शहरात अफीमचा साठा जमा केला जात होता. या प्रकरणात सुमेर जयरामजी बिष्णोई, चावंडसिंग मानसिंग राजपूत, लोकेंद्रसिंह महेंद्रसिंग राजपूत या तिघांना अटक करण्यात आली आहे. पुणे शहरातील गोकुळनगर भागात पोलिसांनी ही कारवाई केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी गस्त घालत होते. यावेळी कात्रज भागात कात्रज-कोंढवा रोडवर एक व्यक्ती अफिमची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी छापा टाकून सुमेर बिष्णोई याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून घटनास्थळावरुन 64 लाख 28 हजार रुपये किंमतीचे 3 किलो 214 ग्रॅम अफीम जप्त करण्यात आले.
पुणे पोलिसांनी सुमेर यांची अधिक चौकशी केली. त्यावेळी त्याने हे अफिम चावंडसिंग राजपूत आणि लोकेंद्रसिंह राजपूत यांच्याकडून घेतल्याचे सांगितले. तसेच त्यांच्याकडेही अफिमचा साठा असल्याचे चौकशीत कबुल केले. त्यानुसार पोलिसांनी त्यांच्याकडेही छापा टाकला. या कारवाईत पुणे पोलिसांना आरोपींकडून १ कोटी रुपयांचे अंमली पदार्थ मिळाले. आता हे हे अंमली पदार्थ ते कुठे विकणार होते? याची माहिती पोलिसांच्या तपासानंतर उघड होणार आहे.