पुणे : कोयता गँगची (koyata gang) पुणे शहरात वाढलेल्या दहशतीमुळे पुणे पोलीस (Pune Police)आक्रमक झाले आहेत. कोयता गँगचा बिमोड करण्यासाठी पोलिसांनी धडका सुरु केला आहे. कोम्बिंग ऑपरेशन, रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी करुन पोलीस जबर कारवाई करत आहे. आता पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी १९ ते २० जानेवारीच्या मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन राबवलं. त्यात मोठी कारवाई करण्यात आली. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ही कारवाई केली.
पुणे शहरातील सराईत गुन्हेगारांवर जरब बसवण्यासाठी कोम्बिंग ऑपरेशन आणि मकोकाचा वापर पोलीस करत आहेत. गेल्या दोन आठवड्यात पोलिसांनी राबवलेलं हे तिसरे कोम्बिंग ऑपरेशन आहे. या ऑपरेशनमध्ये पोलिसांनी रेकॉर्डवरील तीन हजार ६८३ गुन्हेगारांची तपासणी केली. त्यापैकी ७०९ गुन्हेगार त्यांच्या वास्तव्यास दिसून आले. त्यापैकी गंभीर गुन्ह्यातील ३४ जणांना बेकायदा अटक केली. त्यात आठ तडीपार गुन्हेगारांचा समावेश आहे.
असे राबवले ऑपरेशन
पुणे शहरातील ५३२ हॉटेल, ढाबे, बसस्टॅंड, रेल्वेस्थानक, लॉजेस आणि सार्वजनिक ठिकाणी पोलिसांनी छापे टाकले. पोलिस ठाण्यांकडून त्यांच्या हद्दीत नाकाबंदी करून एक हजार ४४६ वाहनचालकांची तपासणी केली. त्यापैकी ३२ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. पुणे वाहतूक शाखेकडून एक हजार २२ वाहनचालकांची कोम्बिग ऑपरेशन दरम्यान तपासणी करण्यात आली. त्यापैकी ११५ जणांवर दंडात्मक कारवाई केली.
गुटखा विक्रेत्यांवर कारवाई, हुक्का पार्लरवर छापा
पोलिसांनी जुगार खेळणाऱ्या आरोपींनाही अटक केली. खंडणी विरोधी पथकाने शिवाजीनगरत छापा टाकून सुरेश किसन कलाधर (वय ५९, रा. वडारवाडी, शिवाजीनगर) त्याच्याकडून चार लाख २२ हजार रुपयांचा गुटखा जप्त केला. अंमली पदार्थ विरोधी पथकाने कोंढव्यात हुक्का पार्लरवर छापा टाकून साहित्य जप्त केले. हुक्का पार्लरवर चालवणाऱ्या हॉटेलमालक प्रकाशसिंग नरसिंग चौहान (वय ३९, रा. कोंढवा) याला अटक करण्यात आली. गांजा विक्री केल्याप्रकरणी मार्केट यार्डमधून चाँद शेख याला तर, कोंढव्यात आसिफ अतीक मेनन (वय २२) याला अटक केली. त्यांच्याकडून सुमारे दोन किलो गांजा जप्त केला.