प्रदीप कापसे, पुणे, दि. 28 नोव्हेंबर 2023 | पुणे येथील ससून रुग्णालयातील ड्रग्स तस्करी प्रकरण उघड झाले होते. पुणे पोलिसांच्या गुन्हा शाखा विभागाने ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर अमली पदार्थांचा मोठा साठा जप्त केला होता. त्याची किमत दोन कोटी रुपये होती. मेफिड्रोन नावाचे म्हणजे MD ड्रग्स प्रकरणाचा मास्टरमाइंड रुग्णालयातील कैदी ललित पाटील होता. या प्रकरणात त्याचे नाव समोर आल्यानंतर तो रुग्णालयातून २ ऑक्टोंबर रोजी फरार झाला होता. त्याला मदत करणाऱ्या दोन पोलिसांना या प्रकरणात अटक झाली होती. तसेच इतर पंधरापेक्षा जास्त जणांना अटक झाली आहे. परंतु प्रकरणाचे मूळ असलेल्या ससूनमधील एकाही जणाला अटक झाली नव्हती. अखेर आता ससूनमधून पहिली अटक झाली आहे. महेंद्र शेवते याला गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे.
ललित पाटील पलायन प्रकरणात ससून रुग्णालयातील कर्मचारी महेंद्र शेवते याला गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे. तो ससून रुग्णालयातील कर्मचारी आहे. ललित पाटील ससून रुग्णालयात उपचार घेत असताना याच कर्मचाऱ्याने ललित पाटील याला मदत केल्याचा पोलिसांना संशय आहे. ड्रग्स तस्करी करण्यापासून ललित पाटील याला पळून जाण्यास मदत करण्यापर्यंत महेंद्र शेवते याची भूमिका महत्वाची असल्याचा पोलिसांना संशय आहे.
ललित पाटील याला पुणे पोलिसांनी ड्रग्स प्रकरणात अटक केली होती. तीन वर्षांपासून तो येरवडा कारागृहात होता. त्यातील नऊ महिने त्याचा मुक्काम ससून रुग्णालयात होता. किरकोळ आजारांवर अनेक दिवस त्याच्यावर उपचार सुरु होते. यामुळे ससून हॉस्पिटलसंदर्भात विरोधकांकडून अनेकवेळा आवाज उठवण्यात आला. परंतु अद्याप ससूनमधील एकाही कर्मचाऱ्यावर कारवाई झाली नव्हती. पुणे पोलिसांनी त्यांच्या विभागातील दोन कर्मचाऱ्यांना अटक केली होती. त्यानंतर पोलीस ससून रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची चौकशी सुरु केली असल्याचे म्हटले जात होते. ललित पाटील याच्यावर उपचार करणारे डॉक्टर संजीव ठाकूर आणि त्यांच्या पथकातील डॉक्टरांची चौकशी सुरु केली होती. गेल्या पंधरा दिवसांपासून गुप्तपणे ही चौकशी सुरु केली होती. या चौकशीनंतर पहिली अटक झाली आहे.