पुणे | 3 ऑक्टोंबर 2023 : पुणे येथील ससून रुग्णालयातून कैद्याकडून ड्रग्स रॅकेट चालण्याचा खळबळजनक प्रकार उघड झाला होता. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने रुग्णालयाच्या गेटवरच १ किलो ७५ ग्रॅमचे मेफिड्रोन ड्रग्स जप्त केले होते. त्या ड्रग्सची किंमत सुमारे दोन कोटी रुपये होती. या प्रकरणाचा तपासासाठी पोलिसांकडून चक्र फिरवली जात असताना दुसरा धक्का पुणे पोलिसांना बसला आहे. या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी असलेला ललित पाटील हा पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाला आहे. यामुळे पोलिसांच्या रुग्णालयातील बंदोबस्तावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
येवरडा कारागृहातील कैदी असलेला ललित पाटील विविध आजारांमुळे जूनपासून ससून रुग्णालयात दाखल झाला होता. तो रुग्णालयात राहून ड्रग्स रॅकेट चालवत असल्याचा प्रकार पुणे पोलिसांनी दोन दिवसांपूर्वीच उघड केला होता. त्याच्या तपासातून मोठी माहिती समोर येण्याची शक्यता होती. परंतु सोमवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास ललित पाटील पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला.
ललित पाटील याने छातीत दुखत असल्याचे कारण सांगितले. त्यानंतर त्याचा एक्स रे काढण्यासाठी त्याला दुसऱ्या रुममध्ये नेले जात होते. त्यावेळी पोलिसांना हिसका देऊन तो फरार झाला. तो रेल्वे स्थानकाच्या दिशेने पसार झाला. घटनेची माहिती समजताच बंड गार्डन पोलीस आणि गुन्हे शाखेकडून तपास सुरु करण्यात आला. तसेच या प्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आला.
ललित पाटील याच्या प्रकरणातून ससून हॉस्पिटलमधील कारभार पुन्हा समोर आला आहे. या रुग्णालयात कैदी महिनेमहिने उपचार घेतात. त्या ठिकाणांवरुन ते आपले उद्योग चालवतात. पुणे गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईनंतर ससून रुग्णालयासंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. ललित पाटील याच्या चौकशीतून महत्वाची माहिती मिळाली असती. परंतु आता तो फरार झाल्यामुळे पोलिसांनाही धक्का बसला आहे.