पुणे : पुणे शहरात २०१२ मध्ये झालेल्या साखळी बाँबस्फोट (Pune Bomb Blast) प्रकरणात उच्च न्यायालयाने (Mumbai High court) महत्वाचा निर्णय दिला आहे. पुणे येथील जंगली महाराज रोड (Pune) परिसरातील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपीसंदर्भात हा निर्णय दिला आहे. आरोपी असलम शब्बीर शेख उर्फ बंटी जहागीरदार याला २०१३ मध्ये अटक केली होती.
आरोपी असलम शब्बीर शेख याला १ ऑक्टोबर २०१५ रोजी उच्च न्यायालयाने पहिल्यांदा जामीन मंजूर दिला. परंतु जामिनातील अटींचे उल्लंघन केल्याबद्दल एटीएसच्या विनंतीवरुन २०१९ मध्ये त्याचा जामीन रद्द केला. त्यानंतर शेखने २०२० मध्ये पुन्हा जामीनासाठी अर्ज केला होता. त्यावर आता निर्णय घेत जामीन मंजूर झाला. या प्रकरणात एटीएसने आठ जणांना अटक केली आहे. त्यात मुनीब इक्बाल मेमन, असद खान, इम्रान खान, सय्यद फिरोज, इरफान मुस्तफा लांडगे, फारुख बागवान, काशिफ बियाबानी आणि असलम शब्बीर शेख उर्फ बंटी जहागीरदार यांचा समावेश आहे. काही अद्याप फरार आहेत. आरोपींवर भारतीय दंड संहिता बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्या, महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा म्हणजेत MCOCA, स्फोटक पदार्थ कायदा आणि शस्त्रास्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
काय घडले होते
पुण्यात १ ऑगस्ट २०१२ रोजी जंगली महाराज रोडवर पाच साखळी बॉम्बस्फोट झाले होते. त्यात एक जण जखमी झाला होता. डेक्कन परिसरातील सहा ठिकाणी हे बॉम्ब ठेवले होते. त्यातील पाच बॉम्ब फुटले होते तर एक बॉम्ब फुटला नाही. या स्फोटांचं गांभीर्य सुरुवातीला लक्षात आलं नाही. परंतु काही मिनिटांतच सलग ठेवलेले पाच बॉम्ब फुटल्याने मोठा हल्ला झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर पुण्यातील संपूर्ण यंत्रणा कामाला लागली होती. दहशतवादी संघटना इंडिया मुजाहिद्दीनचा सदस्य कातील सिद्दीकी याच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी बॉम्बस्फोट केले गेले होते. पुणे येथील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर बॉम्बस्फोटाने उडवण्याचा कट रचल्याबद्दल सिद्दीकीला अटक केली होती. येरवडा कारागृहात दोघांनी त्याची हत्या केली होती.