अभिजित पोते, पुणे, दि.1 फेब्रुवारी 2024 | पुणे शहरात पाच जानेवारी रोजी कुख्यात गुंड शरद मोहोळ याची हत्या झाली होती. गँगवारमधून झालेल्या या हत्या प्रकरणानंतर पुणे हादरले होते. या प्रकरणात पुणे पोलिसांनी आठ आरोपींना २४ तासांत अटक केली होती. त्यानंतर तपासादरम्यान १५ आरोपींना अटक करण्यात आली. त्यामध्ये दोन वकिलांचा समावेश आहे. या खून प्रकरणात साहील उर्फ मुन्ना पोळेकर, नामदेव कानगुडे हे मास्टर माइंड असल्याचे बोलले जात होते. परंतु तपासात गँगस्टर गणेश मारणे हा मुख्य आरोपी असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर पुणे पोलीस त्यांच्या शोधात होते. गणेश मारणे याला अटक करण्यासाठी गेल्या २५ दिवसांपासून पोलिसांचे प्रयत्न सुरु होते. अखेर या प्रयत्नास यश आले. सिनस्टाईल पाठलाग करत गणेश मारणे याला नाशिकरोडमधून अटक करण्यात आली. त्याच्यासह तीन जणांना बेड्या ठोकण्यात आल्या.
गणेश मारणे गेल्या अनेक दिवसांपासून फरार होता. गणेश मारणे तुळजापूर येथे गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पुणे पोलिस तुळजापुरात दाखल झाले. परंतु तो पुढे कर्नाटक गेला. यामुळे गुन्हे शाखेचे दुसरे पथक कर्नाटकमध्ये पोहचले. परंतु पुन्हा एकदा गणेश मारणे याने पोलिसांना चकवा दिला. तो कर्नाटकमधून केरळमध्ये पसार झाला. त्यानंतर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी ओडिशा राज्यात गेला. तेथून पुन्हा नाशिकमध्ये आला. पुणे पोलिसांना गणेश मारणे नाशिकमध्ये असल्याची टीप मिळाली. त्यानंतर पुणे पोलिसांनी सापळा रचला.
पुणे पोलीस गणेश मारणे याच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेऊन होते. तंत्रज्ञानाची मदत घेऊन त्याचा ठावठिकाणा शोधत होते. मग त्याचे लोकेशन ट्रेस झाले. त्यानंतर पोलिसांनी नाशिक येथून त्याचा पाठलाग सुरू केला. रस्त्यात तीन ट्रॅव्हल्स बसची तपासणी केली. अखेर मारणेसह त्याच्या साथीदारांना मोटारीतून जात असताना पकडले. पाठलाग करत त्यांना मोशी टोलनाक्याजवळ ताब्यात घेतले. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली.
गणेश मारणे हा शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असून तो गेल्या अनेक दिवसांपासून फरार होता. पुणे पोलिसांनी शरद मोहोळ हत्याप्रकरणी आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई केली आहे. त्यात गणेश मारणे याचाही समावेश आहे.
हे ही वाचा
शरद मोहोळ हत्या प्रकरणात पुणे पोलिसांना मोठा निर्णय, सर्व आरोपींवर…