पुणे विद्यापीठाचे बनावट पदवी प्रमाणपत्र, तीन वर्ष बँकेत नोकरी, असा उघड झाला प्रकार
pune university fake certificate: बनावट प्रमाणपत्रावर मे २०१४ मध्ये पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे म्हटले आहे. शैक्षणिक वर्ष २०१२, १३ आणि १४ या कालावधीतील ते गुणपत्रक आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पुणे येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे बनावट प्रमाणपत्र मिळाल्याचा खळबळजनक प्रकार उघड झाला आहे. विशेष म्हणजे गेल्या तीन वर्षांपासून या बनावट प्रमाणपत्राच्या आधारे एक व्यक्ती बँकेत नोकरी करत होती. शैक्षणिक क्षेत्राला या बातमीमुळे मोठा धक्का बसला आहे. बनावट पदवी प्रमाणपत्र देणारे रॅकेटच कार्यरत असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
काय घडला प्रकार
पुणे येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या दौंड येथील के. जी. कटारिया कॉलेजमधून पदवी घेतल्याचे हे प्रमाणपत्र आहे. बी.कॉम.चे हे प्रमाणपत्र असून त्या आधारे ठाणे येथील खासगी बँकेत नोकरी मिळवल्याचा प्रकार उघड झाला आहे. मागील तीन वर्षांपासून तो व्यक्ती बनावट प्रमाणपत्राच्या आधारे बँकेत कार्यरत आहे. बनावट प्रमाणपत्रावर मे २०१४ मध्ये पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे म्हटले आहे. शैक्षणिक वर्ष २०१२, १३ आणि १४ या कालावधीतील ते गुणपत्रक आहे.
असा उघड झाला प्रकार
बँकेतील व्यवस्थापकाने बँकेत नोकरी करणाऱ्या त्या व्यक्तीच्या कागदपत्रांची पडताळणी सुरु केली. त्यासाठी बँकेकडून चार महिन्यांपूर्वी दौड येथील कॉलेजशी संपर्क साधला गेला होता. त्यावेळी कॉलेजमधील प्रशासनाला धक्का बसला. बँकेने जे प्रमाणपत्र पाठवले होते, ते बनावट असल्याचे निदर्शनास आले. महाविद्यालयाने विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने त्या प्रमाणपत्राची पडताळणी केली. त्यात ते खोटे असल्याचे सिद्ध झाले. त्यानंतर विद्यापीठाचे उपकुलसचिव ज्ञानेश्वर भोसले यांनी पुण्यातील चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.
रॅकेट असण्याची शक्यता
या प्रकारानंतर पुणे विद्यापीठाचे बनावट प्रमाणपत्र देणारे रॅकेटच असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यासाठी बनावट संकेतस्थळ करण्यात आले आहे. ते संकेतस्थळ विद्यापीठाच्या नावाशी साधर्म्य दाखवणारे आहे. त्या माध्यमातून अनेकांची फसवणूक झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता पोलीस तपासात किती जणांना बनावट प्रमाणपत्र मिळाले, या रॅकेटमागे कोण आहे, हे समोर येणार आहे.