अभिजित पोते, पुणे, दि. 10 जानेवारी 2024 | पुणे शहरात गुन्हेगारी वाढली आहे. शरद मोहोळ याचा भर दिवसा खून झाला. कोयता गँगचा धुमाकूळ सुरु आहे. पुणे शहरातील दर्शना पवार हत्या प्रकरण राज्यभर चर्चिला गेले. पुणे शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर विरोधकांकडून सातत्याने आवाज उठवला जात आहे. पोलिसांकडून धडक कारवाई सुरु आहे. त्यानंतर गुन्हेगारी कमी होत नाही. या दरम्यान महिलांसाठी पुणे शहर सुरक्षित राहिले नसल्याचा अहवाल आला आहे. महिलांवरील अत्याचारांमध्ये पुण्याचा राज्यात चौथा क्रमांक आहे. यामुळे पुणे महिलांसाठी असुरक्षित झाल्याचे स्पष्ट होत आहे. पुण्यात गेल्या वर्षभरात अत्याचाराचे ३९४ गुन्हे घडले आहेत. मागील तीन वर्षांमध्ये पुण्यात बलात्काराच्या गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे.
महिला अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये राज्यात पुणे चौथ्या स्थानी आले आहे. शहरात गेल्या दोन वर्षांत तीन हजारांपेक्षा अधिक गुन्हे नोंदविले गेले आहेत. यामुळे महिलांसाठी असुरक्षित शहर अशी एक नवीन ओळख पुणे शहराची होत आहे. पुणेकरांसाठी ही चिंतेची बाब आहे. पुणे शहरात दिवसेंदिवस महिलांच्या अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. हुंड्यापायी महिलांना दिली जाणारी क्रूर वागणूक या गुन्ह्यांमध्येही वाढ झाल्याचे दिसून येत आहे. गेल्या वर्षात तब्बल ३९४ बलात्काराचे गुन्हे समोर आले आहेत. याशिवाय विनयभंग आणि इतर गुन्हेही मोठ्या प्रमाणावर आहे.
पुण्यासह पिंपरी-चिंचवडमध्ये अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. पुणे शहरात जे अत्याचाराचे गुन्हे दाखल झाले आहे त्यात ओळखीच्या अथवा नात्यातील व्यक्तींकडूनही अत्याचार केले जात असल्याचे समोर येत आहे. यासह अल्पवयीन मुलींना लग्नाचे किंवा प्रेमाचे आमिष दाखवून अत्याचार करण्याच्या घटनाही वाढल्या आहेत. पुणे शहरात या प्रकारच्या दीड हजारापेक्षा अधिक गुन्ह्यांची नोंद पोलिस ठाण्यांत झाली आहे. पुणे शहर निवृत्तनंतर राहण्यासाठी सर्वाच चांगले ठिकाण असल्याचे म्हटले जात होते. शहरात प्रदूषणाची समस्या असली तरी वातावरण चांगले होते. परंतु आता गुन्हेगारी वाढल्यामुळे सर्वांसाठी चिंतेची बाब बनली आहे.