पुणे | 16 ऑक्टोंबर 2023 : पुणे येथील ससून रुग्णालयात सुरु असलेले ड्रग्स तस्करी प्रकरण नुकतेच उघड झाले होते. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने हे प्रकरण उघड केले होते. या प्रकरणाचा मास्टर माइंड असलेल्या ललित पाटील याच्या साथीदाराकडून ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. सुमारे दोन कोटी रुपयांचे 1 किलो 75 ग्रॅमचे मेफिड्रोन नावाचे ड्रग्स जप्त करण्यात आले होते. हे प्रकरण उघड झाल्यानंतर रुग्णालयातून ललित पाटील फरार झाला. त्यानंतर ससून रुग्णालय आणि पुणे पोलिसांवर चौफेर टीका होऊ लागली आहे. यामुळे या प्रकरणी बारा दिवसांनी वेगवान घडामोडी घडल्या आहेत.
या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारकडून चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीचे अध्यक्ष वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे प्रभारी संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर आहेत. या समितीत डॉ. सुधीर देशमुख, डॉ. हेमंत गोडबोले आणि डॉ. एकनाथ पवार आहे. ही समिती ससूनमध्ये दाखल झाली. समितीकडून अधिष्ठाता संजीव ठाकूरसह सर्वच कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात आली. समितीने ससून रुग्णालयातील ८० जणांचे जबाब नोंदवले आहे. कैदी रुग्णांना एडमिट करुन घेतल्याची कारण, त्यांच्यावर सुरु असलेले उपचार, होत असलेले निदान याची केली कसून चौकशी केली जात आहे. या आठवड्यात पुन्हा समिती ससून रुग्णालयात जाणार आहे.
ललित पाटील ड्रग्स प्रकरणानंतर आता ससून प्रशासनही खळवळून जागे झाले आहे. येरवडा कारागृहातून आलेल्या कैद्यांना ड्रेस कोड देण्याचा निर्णय ससून प्रशासनाने घेतला आहे. ससूनमधील वॉर्ड क्रमांक ६ मध्ये कैदी रुग्णांवर उपचार केले जातात. आता ललित पाटील प्रकरणाची पुनरावृत्ती होवू नये म्हणून ड्रेस कोड दिला जात आहे.
ललित पाटील याचा भाऊ भूषण पाटील याला नेपाळ सीमेवर अटक करण्यात आली आहे. परंतु ललित पाटील अद्यापही फरार आहे. तो नेपाळमध्ये पळून गेला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मेफेड्रोन विक्रीच रॅकेटमुळे त्याचे विदेशातील ड्रग्ज माफियांशी आधीपासूनच संबंध आहेत. त्याचा फायदा घेऊन तो विदेशात असल्याची पळाल्याची शक्यता आहे.