पुणे, दि. 7 जानेवारी 2024 | पुणे शहरात शुक्रवारी भरदिवसा चार हल्लेखोरांनी गुंड शरद मोहोळ याची भरदुपारी हत्या केली. मुळशी पॅटर्नच्या या घटनेनंतर पुणे शहरात खळबळ माजली. या प्रकरणात पोलिसांनी आठ आरोपींना अटक केली. त्यात दोन वकिलांचा समावेश आहे. या हत्या प्रकरणात सूत्रधार म्हणून साहिल उर्फ मुन्ना पोळेकर आणि त्याचा मामा नामदेव कानगुडे यांचे नाव समोर आले आहे. ही हत्या करण्यापूर्वी शरद मोहोळ याच्यासोबत त्याच्या साथीदारांनी जेवण केले होते. त्यानंतर सर्व जण घरातून बाहेर पडले. घरातून बाहेर पडल्यावर त्यांनी गोळीबार केला. त्यानंतर काय झाले ते दोन्ही वकिलांनी सांगितले. हे बोलताना त्यांना अश्रू अनावर झाले.
आम्हाला आरोपींचा फोन आला. त्यांनी खून केला आहे. त्यांना पोलीस ठाण्यात हजर व्हायचे आहे. आम्ही त्यांना तोच सल्ला दिला. त्याची माहिती पोलिसांना फोनद्वारे कळवली. त्यावेळी घटनास्थळी असलेल्या पोलिसांना आम्ही तेच सांगितले. पण त्यांनी आमचे ऐकले नाही, या शब्दांत एका वकिलाने बाजू मांडली. आम्ही पंधरा वर्षांपासून वकिली करत आहोत. आम्ही काहीही केलेली नाही, असे सांगताना दुसऱ्या वकिलास अश्रू अनावर झाले. वकिल न्यायालयात रडायला लागला तेव्हा तुम्ही काहीच केले नसेल तर घाबरण्याची गरज नाही, असे न्यायालयाने त्यांना आश्वस्त केले.
आरोपींना कोर्टात आणताना बार असोसिएशनचे सदस्य आणि वकिलांची मोठी गर्दी होती. त्यामुळे आरोपींना कोर्टात आणणेही अवघड झाले. त्यावर न्यायालयाने वकिलांना बाहेर जाण्याची सूचना केली. त्यानंतर गर्दी कमी झाली नाही. यामुळे न्यायालयाने बार असोसिएशनच्या विरोधात ऑर्डर देण्याबाबत पाऊल उचलले. आरोपींना आणले तेव्हा न्यायालयात मोठा बंदोबस्त होता. दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकवल्यानंतर न्यायालयाने वकिलांचा सहभाग सिद्ध होणे आवश्यक असल्याचे सांगत रवींद्र पवार आणि संजय उडाण यांनी दोन्ही वकिलांना आठ जानेवारीपर्यंत तर इतर सहा आरोपींना दहा जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली.