Sidhu Moose Wala : सिद्धू मुसेवाला हत्याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांची गुजरातमध्ये मोठी कारवाई! शार्प शूटर संतोष जाधवला बेड्या
Pune Police : संतोष जाधवच्याही मुसक्या आवळण्यात आल्यात. गुजरातमधून त्याला अटक करण्यात आली.
पुणे : पंजाबमधील प्रसिद्ध गायक सिद्धू मुसेवाला हत्याप्रकरणातील (Sidhu Moose Wala murder case) आणखी एका संशयित आरोपीला पुणे पोलिसांनी (Pune Police News)अटक केली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी गुजरातमध्ये याप्रकरणी अटकेची कारवाई केली. गेल्या काही महिन्यांपासून फरार असलेल्या संतोष जाधव (Santosh Jadhav Arrest) याला पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर संतोष जाधवला 20 जूनपर्यंत पोलीस कोठडीही सुनावण्यात आली आहे. रात्री उशिरा त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. शूटर संतोष जाधव हा सिद्धू मुसेवाला हत्याप्रकरणातील संशयित आरोपी आहे. 2021 साली पुण्यातील मंचरमध्ये झालेल्या हत्याकांड प्रकरणी संतोष जाधवचा गेल्या काही महिन्यांपासून शोध सुरु होता. अखेर त्याच्या मुसक्या आवळण्यात पुणे ग्रामीण पोलिसांना यश आलं आहे. सिद्धू मुसेवाला हत्याप्रकरणातही त्याचा हात असल्याचा संशय पोलिसांना आहे. आता त्याची कसून चौकशी केली जातेय. संतोष हा लॉरेन्स बिश्नोई गँगचा सदस्य आहे.
गुजरातमधून मोठी कारवाई
संतोष जाधव आणि नागनाथ सूर्यवंशी यांची नावं मुसेवाला हत्याकांडात समोर आली होती. त्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत संतोष जाधवचा शोध सुरु केला होता. दरम्यान, सिद्धेश कांबळे उर्फ महाकाल याला आधीच पोलिसांनी अटक केली आहे. महाकाल हा देखील लॉरेन्स बिश्नोई गँगचा सदस्य होता. त्याच्यावर गेल्याच आठवड्यात अटकेची कारवाई करण्यात आली होती. संगमनेर जवळून महाकाल याला अटक करण्यात आली होती. आता संतोष जाधवच्याही मुसक्या आवळण्यात आल्यात. गुजरातमधून त्याला अटक करण्यात आली.
जाधवच्या शोधासाठी बिश्नोईचीही चौकशी
ओंकार उर्फ राण्या बाणखेले खून प्रकरणातील संतोष जाधवच्या शोधासाठी पोलीसांनी लॉरेन्स बिष्णोईची चौकशी केली होती. लॉरेन्स बिश्नोईच्या चौकशी करण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांचे एक पथक दिल्लीलाही गेलं होतं. राण्या बाणखेलेच्या खुनानंतर संतोष जाधव फरार झाला होता. जाधवच्या शोधासाठी ग्रामीण पोलिसांनी यापूर्वीच लूकआऊट नोटीस बजावली होती. सिद्धू मुसेवाला खून प्रकरणात संशयित आरोपी म्हणून संतोष जाधवचा ठावठिकाणा शोधण्यासाठी लॉरेन्स बिष्णोईची चौकशी करण्यात आली होती. अखेर आता संतोष जाधवला अटक करण्यात आली असून त्याची आता कसून चौकशी केली जातेय.
संतोषची कसून चौकशी सुरु
संतोष जाधववर चोऱ्या, हत्येसारख्या अनेक गुन्ह्यांचा आरोप आहे. तो रेकॉर्डवरील एक सराईत गुन्हेगार आहे. जाधवच्या चौकशीतून अनेक गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता वर्तवली जातेय. संतोष जाधव हा मूळचा पोखरी या आंबेगाव तालुक्यातील राहणारा होता. मंचरमध्ये त्याची सासूरवाडी होती. संतोष जाधवने पुण्यातून दूर जात राज्याबाहेर मोठी टोळी तयार केल्याचंही सांगितलं जातं.
मध्य प्रदेशसह, हरियाणा, राजस्थान इथं त्यांनं गुन्हेगारी गँग तयार केल्याचा संशय व्यक्त केला जातो. एकूण चार राज्यात संतोष जाधवचा शोध गेल्या काही महिन्यांपासून पोलिसांकडून घेतला जात होता. चोरी, हत्या असे गंभीर गुन्हे संतोष जाधववर आहेत. ओंकार उर्फ राण्या बाणखेले खून प्रकरणात मोक्का कारवाई करण्यात आली आहे