बांधकाम सुरु असताना शाळेतून घरी जाणाऱ्या नऊ वर्षाच्या मुलाच्या डोक्यात सळई पडली
Pune News : पुणे शहरात बुधवारी दुर्देवी घटना घडली. शाळेतून परत जाणाऱ्या मुलाच्या डोक्यावर सळई पडली. बांधकाम व्यावसायिकाने मुख्य रस्त्यावर कोणत्याही सुरक्षा उपाययोजना केल्या नव्हत्या. त्यामुळे नऊ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
योगेश बोरसे, पुणे, दि. 23 नोव्हेंबर | पुणे शहरातील बाणेर परिसरात एक दुर्देवी घटना घडली. बाणेर परिसरातील गणराज चौकाजवळ मुख्य रस्त्यावर केतन वीरा बिल्डरचे बांधकाम सुरू होते. त्या मुख्य रस्त्यावरुन एक शाळकरी मुलगा जात होता. त्यावेळी लोखंडी सळई त्या मुलाच्या डोक्यात पडली. त्यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. परंतु उपचार सुरु असताना त्याचे निधन झाले. रुद्र केतन राऊत (वय ९, रा. श्रीनाथ सोसायटी, वीरभद्रनगर, बाणेर) असे त्या मुलाचे नाव आहे. या ठिकाणी विकासकाने कोणत्याही सुरक्षा उपाययोजना केल्या नव्हत्या. त्यामुळे त्या मुलाचा मृत्यू झाला. या प्रकरणी गृहप्रकल्पाचे संचालक, बांधकाम ठेकेदार आणि अभियंत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आई बचावली पण मुलाचा मृत्यू
रुद्र केतन राऊत याला शाळेतून घरी आणण्यासाठी त्याची आई पूजा राऊत गेली होती. पुण्यात बाणेर गणराज चौकाजवळून बुधवारी दुपारी २.३० वाजता ते जात होते. त्यावेळी रुद्रच्या डोक्यावर सळईचा तुकडा पडला. बिल्डिंगवरून पडलेल्या सळईच्या तुकड्यामुळे रुद्र राऊत रक्तबंबाळ झाला. त्याला लागलीच ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेत रुद्रची आई पूजा थोडक्यात बचावली. दरम्यान, सुरक्षा उपाययोजना नसताना बांधकाम होत असल्याबद्दल या भागातील नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. त्याची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे स्थनिक नागरिकही संतप्त झाले आहेत.
सुरक्षा उपायोजना नसताना बांधकाम
केतन वीरा बिल्डरचे बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी कोणतीही सुरक्षा उपाययोजना करण्यात आली नव्हती. अपघातानंतर चतु:शृंगी पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली. त्यावेळी बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी कोणत्याही सुरक्षाविषयक उपाययोजना केल्या नसल्याचे पोलिसांना दिसून आले. मुख्य रस्त्यावर बांधकाम होत असताना इमारतीच्या परिसरात जाळी बसवली गेली नाही. यामुळे पोलिसांनी दुर्घटनेस कारणीभूत असल्याचा ठपका ठेवत बांधकाम व्यावसायिक, ठेकेदार आणि अभियंत्यावर गुन्हा केला आहे.