पुणे शहरात तणाव, पोलिसांच्या सुट्या रद्द, कोणी पसरवली ती अफवा
Pune News : पुणे शहरात शुक्रवारी मध्यरात्रीपासून तणाव निर्माण झाला आहे. कसबा पेठेत असणाऱ्या सलाउद्दीन दर्ग्याच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई होणार असल्याची अफवा पसरल्यामुळे शहरात तणाव निर्माण झाला आहे.
प्रदीप कापसे, पुणे | दि. 9 मार्च 2024 : पुणे शहरात शुक्रवारी मध्यरात्रीपासून तणाव निर्माण झाला आहे. एका अफवेमुळे हा तणाव निर्माण झाला आहे. त्यानंतर परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. कसबा पेठेत असणाऱ्या सलाउद्दीन दर्ग्याच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई होणार असल्याची अफवा पसरल्यामुळे शहरात तणाव निर्माण झाला आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कोणत्या ही अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन केले आहे. तसेच अफवा पसरवणाऱ्याचा शोध सुरु केला आहे.
काय आहे प्रकार
पुणे शहरातील कसबा पेठेतील शेख सल्लाह दर्गा परिसरात अनधिकृत असणाऱ्या अतिक्रमणावर करवाई होणार असल्याची अफवा शुक्रवारी मध्यरात्री पसरली. त्यानंतर या ठिकाणी मोठ्या संख्येने मुस्लीम समाज जमा झाला. अफवेनंतर काही काळ परिसरात तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी बंदोबस्त वाढवून परिस्थिती सामान्य केली. शहरात तणाव असला तरी शांतता आहे.
पोलीस आयुक्तींनी घेणार बैठक
पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार आज मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाची बैठक घेणार आहेत. शुक्रवारी मध्यरात्री घडलेल्या घटनेवर मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाशी अमितेश कुमार चर्चा करणार आहेत. तसेच ही अफवा कोणी पसरवली त्याचा शोध सुरु केला आहे. एका अफवेमुळे एवढा जमाव त्या ठिकाणी कसा जमला याची माहिती अमितेश कुमार घेणार आहेत. पोलीस आयुक्तांकडून नागरिकांना शांततेचे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी कोणत्या ही अफवांवर विश्वास ठेवू नका, असे त्यांनी म्हटले आहे.
कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या सुट्या रद्द
पुण्यातील तणावामुळे पुणे पोलीस दलातील सर्व पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी हे आदेश काढले आहेत. आज आणि उद्या सर्व पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर या सगळ्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे.
पुण्येश्वर मंदिर परिसरात बडे अधिकारी
पुणे पोलीस दलातील सर्व बडे पोलीस अधिकारी पुण्येश्वर मंदिराच्या परिसरात आले आहेत. पुण्याचे सहपोलीस आयुक्त, अप्पर पोलीस आयुक्त यांच्याकडून संपूर्ण परिसराचा आढावा घेण्यात आला आहे. दर्ग्याच्या जागेवर पुण्येश्वर (शंकराचे) मंदिर असल्याचा दावा हिंदू संघटनांकडून गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे. मात्र संबंधित ठिकाणी मशिदच आहे, असा दावा मुस्लिम समाजाकडून करण्यात येत आहे. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.