पुणे तिथे काय उणे…! ज्वेलर्सवर उद्घाटनाच्या दिवशीच चोरट्यांचा डल्ला
पुण्याजवळील लोणंद परिसरात लक्ष्मी गोल्ड ज्वेलरी नावाचे नवीन ज्वेलर्स शॉप उघडण्यात आले आहे. मालकाने या दुकानाचे शानदार उद्घाटनही केले. मात्र अचानक घुसलेल्या चोरट्यांनी मालकाच्या आनंदावर पाणी फेरले.
पुणे : पुणे तिथे काय उणे असे म्हटले जाते, ते उगाच नव्हे. पुण्याजवळील लोणंदमध्ये चोरट्यांनी चांगलीच कमाल दाखवत चक्क उद्घाटनाच्याच दिवशी ज्वेलर्सवर डल्ला मारला. दुकान उघडून एक दिवसही उलटत नाही तोच किंमती ऐवज चोरट्यांनी लंपास केल्यामुळे दुकान मालकावर डोक्यावर हात मारण्याची वेळ आली आहे. ज्वेलर्समधील सीसीटीव्हीमध्ये एक महिला आणि पुरुष दोघे संशयास्पद वावरताना आढळले आहेत. पोलिसांनी या दोघा संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांनी वापरलेली कारही जप्त केली आहे. कायदा-व्यवस्थेची कसलीही तमा न बाळगता चोरट्यांनी केलेल्या या बेधडक चोरीची पुण्यात खुमासदार चर्चाही रंगू लागली आहे. (Theft at a jewelers shop on the opening day in Pune)
नेमकी घटना काय?
पुण्याजवळील लोणंद परिसरात लक्ष्मी गोल्ड ज्वेलरी नावाचे नवीन ज्वेलर्स शॉप उघडण्यात आले आहे. मालकाने या दुकानाचे शानदार उद्घाटनही केले. मात्र अचानक घुसलेल्या चोरट्यांनी मालकाच्या आनंदावर पाणी फेरले. दुकानात एका महिलेने पुरुष साथीदाराच्या मदतीने चोरीचे धाडस केले. ज्योत्स्ना सूरज कछवाय असे अटक केलेल्या 29 वर्षीय आरोपी महिलेचे नाव आहे. ती पुण्यातील आंबेगाव खुर्द येथील रहिवासी आहे. तर तिच्या साथीदाराचे नाव निलेश मोहन घुते (34) असे आहे. तो कात्रज परिसरातील गुजरवाडी फाटा येथील रहिवासी आहे. लोणंद पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत या दोघा आरोपींच्या मुसक्या आवळल्या. त्यांनी गुन्ह्यात वापरलेली कार पोलिसांनी हस्तगत केली आहे. या घटनेचा पुढील तपास लोणंद पोलीस करत आहेत.
सीसीटीव्ही फुटेजमुळे दोघे आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
मिळालेल्या माहितीनुसार आरोपी ज्योत्स्ना आणि निलेश हे दोघेही सराईत चोरटे असून त्यांनी यापूर्वीही अनेक दुकानांमध्ये चोऱ्या केल्या आहेत. अतिशय नियोजन पद्धतीने चोऱ्या करण्यात त्यांचा हातखंडा असल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. याच अनुभवातून दोघांनी लोणंदमधील ज्वेलरीचे दुकान ऐन उद्घाटनाच्या दिवशी लुटले असून दुकानातील किमती ऐवज लंपास केला आहे. दुकान मालकाने केलेल्या तक्रारीनुसार स्थानिक पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली आणि दुकानाचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. यात पोलिसांना एक महिला आणि पुरुष संशयास्पद हालचाली करताना आढळले. त्यानुसार आरोपींना जेरबंद करण्यात यश मिळवले. दुकान मालकाने त्वरित लोणंद पोलीस ठाण्यात जाऊन अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यामुळेच पोलिसांना वेळीच आरोपींपर्यंत पोहोचता आले. याकामी त्यांना सीसीटीव्ही फुटेज हा महत्वपूर्ण आधार ठरला. त्याच आधारे तपास करत लोणंद पोलिसांनी दोन्ही आरोपींना बेड्या ठोकत त्यांच्याकडून चोरीचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली कार जप्त केली. (Theft at a jewelers shop on the opening day in Pune)
Video | Pune | सर्व नियमांचे पालन करुन दगडूशेठ मंदिर सुरु करणार#Pune #Dagadusheth #TempleReopen #Temple
अन्य बातम्या, व्हिडीओ पाहा – https://t.co/BV9be230nv pic.twitter.com/k0yh447twS
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 25, 2021
इतर बातम्या
Bigg Boss Marathi 3 | ‘महिला, महिला आणि भांडायला पहिला…’, सोनालीची तृप्ती देसाईंसोबत तूतू-मैमै!
औरंगाबादमध्ये अॅन्टिजेनपेक्षा आरटीपीसीआर चाचण्यांतून अधिक पॉझिटिव्ह, महानगरपालिकेचा अहवाल