सुनिल थिगळे, जुन्नर, पुणे, दि.18 डिसेंबर | कल्याण नगर महामार्गावर जुन्नर तालुक्यातील डिंगोरे गावच्या हद्दीत भीषण अपघात झाला. रविवारी रात्री झालेल्या या अपघातात तब्बल ८ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ट्रक, टेम्पो आणि रिक्षा यांच्यात हा विचित्र अपघात झाला. अपघातात रिक्षेमधील आठ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ४ वर्षाच्या मुलाचा आणि ६ वर्षाच्या मुलीचा समावेश आहे. तसेच पाच पुरुष एक महिला आहे. हा अपघात जुन्नर तालुक्यातील डिंगोरे गावाजवळ अंजीराची बाग येथे झाला.
जुन्नत तालुक्यातील डिंगोरे येथे अंजीराची बागजवळ रविवारी रात्र ट्रक, टेम्पो, आणि रिक्षा यांच्यात अपघात झाला. पिकअप ओतूरवरुन कल्याणकडे जात होती. तर रिक्षा आणि ट्रक ओतूरकडे येत होते. अपघातात गणेश मस्करे, कोमल मस्करे, हर्षद मस्करे, काव्या मस्करे, नरेश दिवटे यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच इतर तीन मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. रिक्षा चालक नरेश दिवटे याची ओळख पटली आहे. मात्र रिक्षातील इतर तीन प्रवाशांची ओळख पटवण्याचे काम ओतूर पोलिसांकडून सुरू आहे. पिकअप रिक्षेमधील चार जण हे जुन्नर तालुक्यातील मढ पारगावचे रहिवाशी आहेत.
अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने पोलिसांना फोन केला. ओतूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे आणि त्याच्या टीमने घटनास्थळी पंचनामा केला.
पोलीस घटनास्थळी पोहचल्यावर मदत आणि बचावकार्य सुरु केले. पोलिसांना ग्रामस्थांनीही मदत केली. मृत्यू झालेल्या व्यक्तींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे.