Sharad Mohol | शरद मोहोळची हत्या कुणी आणि का केली? पोलीस तपासातून महत्त्वाची माहिती उघड
पुणे पोलिसांनी शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीला शोधून काढलं आहे. पोलिसांनी घटनेनंतर अवघ्या आठ तासात तपासाची चक्रे फिरवत आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. आरोपींनी शरद मोहोळची हत्या का केली? याबाबतची माहितीदेखील पोलीस तपासात समोर आली आहे.
पुणे | 6 जानेवारी 2024 : पुण्यात कुख्यात गुंड शरद मोहोळची हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे भर दिवसा शरद मोहोळची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी या हल्ल्यातील संशयित आरोपींना शोधून काढलं आहे. हल्ल्याच्या घटनेनंतर अवघ्या 8 तासात पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहोत. आरोपी पळून जाण्याच्या बेतात होते. पण पोलिसांनी आरोपींच्या नांग्या ठेचल्या आहेत. शरद मोहोळवरील हल्ल्याच्या घटनेनंतर पोलिसांच्या वेगवेगळ्या पथकांनी संपूर्ण पुण्याला पिंजून काढत आरोपींच्या मुसक्या आवळण्याची मोहिम सुरु केली होती. पुणे शहर गुन्हे शाखेची 9 पथके पुणे शहर परिसर, पुणे ग्रामीण, सातारा आणि कोल्हापूरच्या दिशेने आरोपींचा शोध घेत होते. या दरम्यान पुणे-सातारा रोडवर किकवी ते शिरवळ दरम्यानल पोलिसांना संशयित आरोपी सापडले.
पोलिसांना शिवापूर टोल नाक्याच्या पुढे किकवी ते शिरवळ दरम्यान एका स्विफ्ट कारवर संशय आला. पोलिसांनी त्या गाडीचा पाठलाग केला. त्यानंतर योग्यवेळी संधी साधत आरोपींच्या गाडीला वेढा घातला. पोलिसांनी आरोपींच्या गाडीची तपासणी केली असता त्यांच्याकडे 3 पिस्टल, 3 मॅगझीन, 5 राउंड आढळल्या. पोलिसांनी या सर्व वस्तू जप्त केल्या. तसेच आरोपींच्या दोन चारचाकी गाड्यादेखील पोलिसांनी ताब्यात घेतल्या.
आरोपींनी शरद मोहोळची हत्या का केली?
आरोपींनी शरद मोहोळची हत्या का केली असेल? असा प्रश्न अनेकांना पडला होता. पोलिसांकडून या प्रकरणी तपास सुरु आहे. पण पोलिसांच्या प्रथमदर्शी तपासानुसार आरोपींनी शरद मोहोळची हत्या ही जमिनीच्या पैशाच्या जुन्या वादातून केल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणी पुणे शहर गुन्हे शाखेने शरद मोहोळ याच्यावर गोळीबार करणारा आरोपी आणि त्याला मदत करणाऱ्या इतर आरोपींना ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी याप्रकरणी आतापर्यंत एकूण 8 आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीचं नाव साहिल उर्फ मुन्ना पोळेकर असं आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
आरोपींनी हल्ला कसा केला?
कुख्यात गुंड शरद मोहोळ याची शुक्रवारी (5 जानेवारी) भर दुपारी एक वाजता कोथरुडच्या सुतारदरामध्ये त्याच्यावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. विशेष म्हणजे शरद मोहोळ घराबाहेर पडला तेव्हा आरोपी त्याच्यासोबतच होते. आरोपी मुन्ना पोळेकर याने योग्य संधी साधत शरद मोहोळवर पाठून गोळी झाडली. त्याने शरद मोहोळच्या पायाला आणि पाठीवर गोळी झाडली. यानंतर आपल्यावर कोणी गोळी झाडली हे पाहण्यासाठी मागे फिरलेल्या शरद मोहोळच्या छातीवर मुन्ना पोळेकर याने तिसरी गोळी झाडली. एका पाठोपाठ सलग तीन गोळ्यांच्या हल्ल्याने शरद मोहोळ जखमी होऊन जमिनीवर पडला.
(हेही वाचा : पुण्यात गुंडांच्या गोळीबारात मारला गेलेला कुख्यात गुंड शरद मोहोळ कोण होता?)
गोळीबाराचा आवाज ऐकून परिसरातील नागरीक घराबाहेर पडले. पण तोपर्यंत आरोपी तिथून पळून जाण्यात यशस्वी ठरले. संबंधित घटनेनंतर तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली. तसेच जखमी झालेल्या शरद मोहोळला पुण्याच्या ससून रुग्णालयात नेण्यात आलं. पण उपचारादरम्यान रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संपूर्ण पुणे हादरलं होतं. पुणे पोलीसदेखील प्रचंड कामाला लागले होते. अखेर आठ तासांमध्ये पोलिसांनी या घटनेतील मुख्य आरोपीला शोधून काढले.