आमदार, मंत्र्यांची ओळख…28 लाख घेऊन सरळ जिल्हाधिकारी कार्यालयात केली बनावट नियुक्ती
Fake Job: पुण्यातील एका हॉटेल मॅनेजरची नोकरीसाठी फसवणूक करण्यात आली. त्या व्यक्तीकडून २८ लाख रुपये घेऊन पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात नियुक्तीचे बनावट पत्र देण्यात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्या व्यक्तीने आता गुन्हा दाखल केला आहे.
नोकरीत फसवणुकीचे अनेक प्रकार अधूनमधून घडत असतात. त्यानंतरही सरकारी नोकरी मिळण्याच्या अपेक्षेने अनेक जण एजंट अन् तोतयागिरी करणाऱ्या लोकांच्या जाळ्यात येतात. ही लोक उच्चपदस्थांशी आपली ओळख आहे, असे दाखवून बेरोजगार युवकांची फसवणूक करत असतात. पुणे शहरात फसवणुकीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आमदार, मंत्र्यांशी आपली ओळख आहे, असे सांगत पुण्यातील एका हॉटेल मॅनेजरची नोकरीसाठी फसवणूक करण्यात आली. त्या व्यक्तीकडून २८ लाख रुपये घेऊन पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात नियुक्तीचे बनावट पत्र देण्यात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्या व्यक्तीने आता गुन्हा दाखल केला आहे.
कसा घडला प्रकार
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील राहणारे समाधान रमेश सोनवणे (सध्या राहणार, उरळीकांचन, पुणे) हे एका एका हॉटेलमध्ये मॅनेजर आहेत. त्यांनी एमबीएपर्यंत शिक्षण घेतले आहे. त्यांच्या हॉटेलमध्ये सिद्धार्थ देविदास झेंडे (३५), सीमा सिद्धार्थ झेंडे (दोघेही रा. म्हसोबावाडी, ता. इंदापूर, जि. पुणे) उतरले होते. त्यावेळी त्यांची ओळख झाली. यावेळी महसूल विभागात 87 जागा भरायचे असल्याचे झेंडे यांनी सोनवणे यांना सांगितले. आपली मंत्र्यांशी ओळख आहे, तुमचे काम करून देतो, असे सांगून त्यांनी सोनवणे यांचा विश्वास संपादन केला.
फसवणुकीचा प्रकार उघड
सरकारी नोकरी मिळणार या आशेने सोनवणे यांनी पैशांची जमवाजमव सुरु केली. २६ फेब्रुवारी ते १५ मार्च २०२४ च्या दरम्यान झेंडे दाम्पत्याने सोनवणे यांच्याकडून 28 लाख 78 हजार रुपये घेतले. त्यांना महसूल विभागात सहायक लिपिकपदाचे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील नियुक्ती पत्र दिले. परंतु त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
आपणास मिळालेले नियुक्तीपत्र बनावट असल्याचे त्यांना समजले. यानंतर सोनवणे यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. तपास पोलीस उपनिरीक्षक रवींद्र ढावरे करत आहेत.