19 वर्षाचा तरुण अचानक बेपत्ता झाला, मग सहा दिवसांनी थेट ‘ही’ बातमी आली, तरुणासोबत काय घडलं नेमकं?
एक तरुण अचानक बेपत्ता झाला. घरच्यांनी शोधाशोध सुरु केली, मात्र तो सापडला नाही. अखेर त्यांनी पोलिसात मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. मग सहा दिवसांनी जे समोर आलं त्यानंतर सर्वच हादरले.
शिरूर/पुणे : अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या 19 वर्षीय युवकाला मुळा मुठा नदीच्या पुलावरुन नदीत ढकलून दिल्याची धक्कादायक घटना शिरूर तालुक्यातील न्हावरे येथे घडली आहे. नाना उर्फ विठ्ठल आण्णा कीर्तने असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर बबलू उर्फ रवीराज ज्ञानदेव निंबाळकर असे हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी शिरूर पोलिसात हत्येचा गुन्हा नोंद करण्यात आला असून, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपीची पोलिसांनी चौकशी केली असता चौकशीत हत्येचे जे कारण उघड झालं त्यानंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. याबाबत शिरुर पोलीस अधिक तपास करत आहेत.
आरोपीला ब्लॅकमेल करुन पैसे उकळायचा तरुण
शिरूर तालुक्यातील न्हावरे येथील निंबाळकर वस्ती येथे राहणाऱ्या बबलू उर्फ रविराज याचे गावातील एका महिलेची अनैतिक संबंध होते. या संबंधाची माहिती मयत युवक नाना याला मिळाली. यानंतर तो बबलूला ब्लॅकमेल करु लागला होता. अनैतिक संबंधाबाबत सर्वांना सांगण्याची धमकी देत वारंवार पैशाची मागणी करून पैसे उकळत होता. तसेच मी महिलेसोबत पोलिसात जाऊन तुझ्यावर बलात्काराची केस करेल अशीही धमकी देत होता. नानाच्या या धमकीमुळे आरोपी त्रस्त झाला होता. यामुळेच त्याने तरुणाचा काटा काढण्याचे ठरवले.
ब्लॅकमेलिंगला कंटाळून तरुणाचा काटा काढला
बबलू याने 24 मे रोजी मयत नानाला आपल्या दुचाकीवर बसवून मुळा मुठा नदीच्या पुलावर घेऊन गेला. मग पुलावरुन त्याला पाण्यात ढकलून दिले. यात नानाचा मृत्यू झाला. नाना हा मूळचा नगर जिल्ह्यातील असून, सध्या पुण्यातील शिरूरमध्ये राहत होता. तरुण अचानक बेपत्ता झाल्याने त्याच्या कुटुंबीयांनी शिरूर पोलीस ठाण्यात नाना बेपत्ता झाल्याची तक्रार दिली.
पोलिसांनी तरुणाचा शोध सुरु केला. यादरम्यान सहा दिवसांनी त्याचा मृतदेह मुळा मुठा नदीमध्ये सापडला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. यानंतर शिरूर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आणि सखोल तपास केला. तपासात जे उघड झाले त्यानंतर सर्वच हादरले. यानंतर शिरूर पोलीस ठाण्यात बबलू उर्फ रविराज ज्ञानदेव निंबाळकर याच्याविरोधात गुन्हा दाखल करत, त्याला अटक केली. पुढील तपास शिरूर पोलीस करत आहे.