धुक्याचा अंदाज आला नाही अन् क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं… कार-टेम्पोच्या धडकेत तिघांचा मृत्यू
दाट धुक्याचा अंदाज न आल्यामुळे पुण्याजवळील मंचर येथे एक भीषण अपघात झाला. पुणे नाशिक महामार्गावर मंचर येथे क्रूझर गाडी आणि मालवाहू टेम्पोची धडक बसल्याने ही दुर्घटना घडली. ही धडक एवढी भीषण होती, की त्यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला.
सुनील थिगळे , टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, पुणे | 1 डिसेंबर 2023 : सध्या सर्वत्र थंडीचे वातावरण आहे. गारवाही वाढला आहे. वाढत्या थंडीमुळे अनेक ठिकाणी धुकंही पडत असून या धुक्यामुळे अपघात होण्याची शक्यताही अधिक असते. याच दाट धुक्याचा अंदाज न आल्यामुळे पुण्याजवळील मंचर येथे एक भीषण अपघात झाला. पुणे नाशिक महामार्गावर मंचर येथे क्रूझर गाडी आणि मालवाहू टेम्पोची धडक बसल्याने ही दुर्घटना घडली. ही धडक एवढी भीषण होती, की त्यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर पाच जण जखमी झाले असून त्यापैकी दोन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
पुण्याकडे भरधाव चाललेल्या क्रुझर गाडीला पुणे जिल्ह्यातील मंचर येथील जीवन मंगल कार्यालयासमोर भीषण अपघात झाला. शुक्रवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास पुण्याकडे भरधाव चाललेल्या क्रुझर गाडीची पुढे चाललेल्या मालवाहू टेम्पोला पाठीमागच्या बाजूने जोरदार धडक बसून ही दुर्घटना घडली. या अपघातामध्ये तीन जणांचा जागेवर मृत्यू झाला असून पाच जण जखमी आहेत. यामधील दोन जणांची प्रकृती चिंताजनक आहे त्यांच्यावरती खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे. चालक पंकज खंडु जगताप (वय ३६), मधुकर तुकाराम अहिरे (वय ५२), शांताराम संभाजी अहिरे (रा. जायखेडा तालुका सटाणा) अशी मृतांची नावे आहेत.
नातेवाईकांना भेटण्यासाठी जात होते, तेवढ्यात…
आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ही दोन्ही वाहने पुण्याच्या दिशेने चालली होती. मात्र धुक्यामुळे क्रुझर वाहन चालकाला पुढे चाललेला मालवाहू टेम्पो दिसला नाही. व भरधाव असलेली क्रुझर गाडी ही पुढे चाललेल्या मालवाहू ट्रकला जोरात धडकली. यामुळे या क्रुझर गाडीतील चालकासह तीन जण जागेवरतीच ठार झाले तर पाच जण हे जखमी आहेत. क्रूझरमधील सर्व प्रवासी हे नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील सायखेडा गावातील असून ते भोसरी येथे नातेवाईक यांना भेटण्यासाठी चालले होते यावेळी ही दुर्घटना घडली. तर मालवाहू टेम्पो हा जळगाव वरून अवसरी येथील पॉलिटेक्निकल महाविद्यालयातील कपाट बेंच घेऊन येत होता
अपघाताची माहिती समजताच मंचर पोलिस स्टेशनचे पोलिस हवालदार राजेंद्र हिले व पोलीस कॉन्स्टेबल मोमीन यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.