AUDIO | अण्णा बनसोडेंवर हल्ला का झाला? ही ऑडिओ क्लिप ऐका, हल्ल्याच्या एक दिवस आधी शिवीगाळ
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावरील गोळीबार प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत (Anna Bansode Viral Audio Clip)
पिंपरी चिंचवड : पिंपरी विधानसभेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे (Anna Bansode) यांच्यावर काल हल्ल्याचा प्रयत्न झाला होता. बनसोडेंवर झालेल्या गोळीबाराच्या प्रयत्नाआधी कथित आरोपी तानाजी पवार याच्यासोबतचे त्यांचे टेलिफोन संभाषण समोर आले आहे. अण्णा बनसोडे यांनी तानाजी पवारला शिवीगाळ केल्याचे संभाषणातून स्पष्ट होते. बनसोडे यांच्या कर्मचाऱ्यानेही शिवीगाळ केल्याचे व्हायरल ऑडिओ क्लीपमधून स्पष्ट होते. (Pune Pimpri Chinchwad NCP MLA Anna Bansode Viral Audio Clip Telephonic Conversation with accuse Tanaji Pawar)
ऐका ऑडिओ क्लीप :
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावरील गोळीबार प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आमदार अण्णा बनसोडे यांचा मुलगा सिद्धार्थ बनसोडे, पीए यांच्यासह 8 ते 9 जणांवर अपहरण आणि हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर गोळीबार करणारा आरोपी तानाजी पवार याच्यासह तिघांवर आमदार आणि त्यांच्या मुलाला जीवे मारण्यासाठी गोळीबार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
नेमकी तक्रार काय?
पिंपरी चिंचवड महापालिकेचे कंत्राटदार सिजू अँथनी यांच्या कार्यालयात सिद्धार्थ बनसोडे 11 मे रोजी दुपारी घुसले होते. त्यानंतर दोघा कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला. लोखंडी टॉमीसारख्या घातक शस्त्राने दोघांवर हल्ला केल्याचं सीसीटीव्हीत देखील कैद झालं आहे. अँथनी यांच्या कंपनीचे मॅनेजर तानाजी पवार कुठे आहेत, हे कर्मचाऱ्यांनी न सांगितल्याच्या रागातून आमदारपुत्र आणि पीएसह दहा जणांनी हा जीवघेणा हल्ला केल्याचा उल्लेख तक्रारीत आहे.
अण्णा बनसोडे गोळीबारातून वाचले
राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर काल (बुधवार 12 मे) गोळीबार झाला होता. मात्र, या घटनेत कोणीही जखमी झालेलं नाही. पिंपरी चिंचवड पोलिसांकडून या प्रकरणी तपास सुरु आहे. ही घटना काल दुपारी दीडच्या सुमारास घडली होती.
अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार का झाला?
आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर ठेकेदारीच्या वादातून गोळीबार झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला. अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न झाला मात्र, यामध्ये कोणालाही दुखापत झालेली नाही. (Anna Bansode Viral Audio Clip)
गोळीबारावर अण्णा बनसोडे काय म्हणाले?
अण्णा बनसोडे यांनी अँथनी नावाच्या ठेकेदाराला वार्डातील दोन मुलांना कामाला लाव म्हणून सांगितलं होतं. त्यावेळी तो अरेरावी पद्धतीनं बोलला. सकाळी तो आला त्याच्यासोबत त्याचा मेव्हणा होता. त्या व्यक्तीनं गोळीबार केला. मात्र, या प्रकरणामागे नेमकं काय आहे हे पोलिसांनी तपास केल्यानंतर समोर येईल, असं अण्णा बनसोडे म्हणाले. पोलिसांनी याप्रकरणी एका व्यक्तीला अटक केल्याची माहिती आहे.
अण्णा बनसोडे कोण आहेत?
राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे हे 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पिंपरी मतदारसंघातून विजयी झाले आहेत. यापुर्वी ते 2009 मध्ये देखील निवडून आले होते. अण्णा बनसोडे यांनी 2019 च्या निवडणुकीत शिवसेनेचे आमदार गौतम चाबुकस्वार यांचा 16 हजार 856 मतांनी पराभव केला होता. 2014 मध्ये अण्णा बनसोडे यांचा गौतम चाबुकस्वार यांनी 2 हजार मतांनी पराभव केला होता. 2014 च्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर अण्णा बनसोडे यांनी पिंपरी मतदारसंघात जनसंपर्क वाढवला होता.
संबंधित बातम्या :
राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार
(Pune Pimpri Chinchwad NCP MLA Anna Bansode Viral Audio Clip Telephonic Conversation with accuse Tanaji Pawar)