चंदिगढ : एक-दोन नव्हे, तर तब्बल आठ लग्न करुन सासरच्या मंडळींना गंडवणारी ‘दरोडेखोर’ वधू अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडली आहे. सासरच्या घरातून दागिने आणि रोख रक्कम घेऊन पळून जाणाऱ्या तरुणीसह चौघा जणांना अटक झाली आहे. मात्र या वधूबाबत समोर आलेल्या माहितीमुळे पोलिसांचीच झोप उडाली आहे. कारण आठवड्यापूर्वी पकडलेल्या या तरुणीची पोलिसांनी एचआयव्ही चाचणी केली होती. या टेस्टचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आता पोलीस तिच्याशी लग्न केलेल्या सर्व वरांचीही एचआयव्ही चाचणी घेणार आहेत.
काय होती मोडस ऑपरेंडी
‘दरोडेखोर’ वधू टोळीतील तिच्या 3 साथीदारांसह तरुणांना गंडा घालत असे. लग्नानंतर, सासरच्यांनी मारहाण आणि हुंडा मागितल्याची तक्रार करत तरुणी आकांडतांडव करायची. त्यानंतर पंचायत बोलावायची. या काळात संधी मिळताच ती सासरच्या कुटुंबातील दागिने आणि रोख रक्कम घेऊन पळून जायची. या कामात तिची आई सुद्धा तिला साथ देत असे.
आठवड्याभरात गाशा गुंडाळायची
फसवणूक झालेले 8 पैकी 3 नवरदेव हरियाणाचे आहेत. पटियालाच्या जुल्का परिसरात नवव्या वराचा शोध घेत असताना तिला पकडण्यात आले. जिथे तिचे लग्न व्हायचे, तिथे ती सुहागरात किंवा हनिमूननंतर फार फार तर एक आठवडा राहून घरी परत यायची. अशा परिस्थितीत तिच्याकडून फसवणूक झालेल्या वरांनाही एड्सचा धोका निर्माण झाला आहे.
कोण आहे ही दरोडेखोर वधू
आरोपी महिला हरियाणाच्या कैथल जिल्ह्यातील रहिवासी असून तिचे वय 30 वर्षे आहे. आरोपी महिलेचे खरे लग्न 2010 मध्ये पटियाला येथे झाले, या लग्नातून तिला तीन मुलं झाली. त्यांचं वय आता 7 ते 9 वर्षांच्या दरम्यान आहे. यानंतर अचानक तिचा नवरा गायब झाला. या वधूने आपल्या पतीला घटस्फोटही दिला नाही. चार वर्षांपूर्वी तिने दरोडेखोरीची टोळी सुरु केली, त्यानंतर पंजाब आणि हरियाणातील अविवाहित, घटस्फोटित किंवा विधुर पुरुषांना अडकवून त्यांची फसवणूक सुरू केली.
नवव्या लग्नाच्या तयारीत
ही दरोडेखोर वधू 8 लग्न करुन 9 वं लग्न करण्याची तयारी करत होती. यासाठी ती तिच्या टोळीच्या सदस्यांसह देवीगडला पोहोचली. तिथे सर्व जण जुल्का पोलिसांच्या तावडीत सापडले. पाच दिवसांपूर्वी पकडलेल्या या टोळीची चौकशी केल्यानंतर, आरोपींनी पंजाब व्यतिरिक्त हरियाणामध्ये जाळे पसरल्याचे निष्पन्न झाले. तिथे ते 30 ते 40 वर्ष वयोगटातील घटस्फोटित आणि अविवाहित लोकांचा शोध घेत असत.
संबंधित बातम्या :
नवरी बारा वेळा बोहल्यावर चढली, बाराव्या ‘सासरी’ अशी अडकली नि पोलिसांनी ठोकल्या बेड्या