श्रीरामांच्या विरहात दशरथ राजाने मंचावर प्राण सोडला, ‘रामलीला’त चटका लावून जाणारी खरी एक्झिट, सहकलाकार-प्रेक्षकांचा आक्रोश
खरा कलाकार हा प्रचंड मेहनत करुन प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण करतो. उत्तर प्रदेशात सध्या अशाच एका कलाकाराच्या एक्झिटने प्रेक्षकांचं मन पिळवटून गेलं आहे.
लखनऊ : कलाकार होणं खूप कठीण असतं. खरंतर कलाकार हे परमेश्वराने दिलेलं एक वरदान असतं. पण त्याची जाणीव होणं जास्त आवश्यक असतं. आतला आवाज आपल्या कलेची जाणीव करुन देत असतो. कलेला वाव मिळवून देण्यासाठी खूप मेहनतीची गरज असते. खरा कलाकार हा प्रचंड मेहनत करुन प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण करतो. उत्तर प्रदेशात सध्या अशाच एका कलाकाराच्या एक्झिटने प्रेक्षकांचं मन पिळवटून गेलं आहे.
नेमकं प्रकरण काय?
रामायणाचं सादरीकरण सुरु असताना राजा दशरथची भूमिका साकारणारे राजेंद्र सिंह याचं मंचावरच निधन झालं. श्रीराम वनवासात गेल्यानंतर पूत्र विरहाने व्याकूळ झालेल्या दशरथ राजाचा मृत्यू होतो. हाच क्षण रामायण सादरीकरणात सादर झाला. यावेळी राजा दशरथ जमिनीवर कोसळतो. त्याचा मृत्यू होतो. त्यानंतर रंगमंचाचा पडदा खाली पडतो. त्यावेळी राजा दशरथ यांची भूमिका सादर करणारे राजेंद्र सिंह यांचा खरोखर मृत्यू झाल्याचं समोर येतं. ही घटना प्रेक्षकांमध्ये पोहोचल्यानंतर अनेक प्रेक्षक अक्षरश: टाहो फोडतात. उत्साहाच्या वातावरणाचं अचानक शोक सागरात निर्माण होतं. ही अनपेक्षित घटना 14 ऑगस्टला उत्तर प्रदेशच्या बिजनौर जिल्ह्यातील हसनपूर गावात घडली.
नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात दसरा आणि दिवाळी सणानिमित्ताने रामलीला कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. या कार्यक्रमात रामायण नाट्यमय रुपात सादर केलं जातं. हा कार्यक्रम पाहण्यासाठी शेकडो भाविक जमतात. त्यामुळे या कार्यक्रमाला एक वेगळं महत्त्व आहे. रामायण सादर करणारे लोककलावंत देखील खूप अप्रतिम पद्धतीने रामायण लोकांच्या डोळ्यांसमोर उभं करतात. त्यामुळे हा कार्यक्रम पाहण्यासाठी शेकडोंची गर्दी जमते. हसनपूर गावातदेखील असंच रामायण सुरु होतं.
श्रीराम वनवासात गेलेले असतात. त्यांच्या आठवणीत वडील दशरथ राजा व्याकूळ झालेले असतात. ते पूत्र शोकाने इतके व्याकूळ होतात की त्यांच्या त्यात मृत्यू होतो. हाच क्षण मंचावर सुरु होता. हा संपूर्ण क्षण संपल्यानंतर रंगमंचाचा पडदा खाली येतो. सर्व कलाकार विंगेत येतात. पण दशरथ राजाची भूमिका साकारणारे राजेंद्र सिंह हे मंचावरच निर्जीवरित्या पडलेले असतात. त्यांना उठवण्यासाठी त्यांचे सहकलाकार तिथे येतात. तेव्हा राजेंद्र यांचा मृत्यू झाल्याचं इतर कलाकारांच्या निदर्शनास येतं. यावेळी इतर कलाकारांच्या अश्रूंचा बांध फुटतो. या घटनेची माहिती जेव्हा प्रेक्षकांपर्यंत पोहोचते तेव्हा मोठी खळबळ होते. अनेक प्रेक्षकांच्या डोळ्यांमध्ये पाणी येतं.
हेही वाचा :