आरपीएफ जवान चेतन सिंगने प्रवाशांच्या डोक्यात आणि छातीत गोळ्या घातल्या, जयपूर-मुंबई ट्रेन फायरींग प्रकरणाचा पोस्टमार्टेम रिपोर्ट आला
जयपूर सुपरफास्ट एक्सप्रेसच्या हत्याकांडातील मृतांचा पोस्टमार्टेम अहवाल आला आहे. पोस्टमार्टेम रिपोर्टनूसार अतिरिक्त रक्तस्राव आणि शरीरातील मुख्य अवयव क्षतिग्रस्त झाल्याने या चौघांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे.
मुंबई | 2 ऑगस्ट 2023 : मुंबईला येणाऱ्या जयपूर सुपरफास्ट एक्सप्रेसमध्ये सोमवारी वापी ते बोरीवली दरम्यान गाडीच्या सुरक्षा पथकातील आरपीएफ जवान चेतन सिंग याने बेछुट गोळीबार करीत आपला सहकारी आणि तीन प्रवाशांचा बळी घेतला. या प्रकरणातील पोस्टमार्टेम अहवाल आला आहे. चेतन याने आपले वरिष्ठ एएसआय टीकाराम मीणा यांना चार गोळ्या मारल्या. तर दोघांमध्ये वाद झाल्याने त्याने हे पाऊल उचलले. त्याने अन्य एका प्रवाशाला तीन गोळ्या घातल्या. अन्य दोन प्रवाशांना प्रत्येकी दोन गोळ्या मारल्याचे उघडकीस आले आहे.
जयपूर सुपरफास्ट एक्सप्रेसच्या हत्याकांडातील मृतांचा पोस्टमार्टेम अहवाल आला आहे. पोस्टमार्टेम रिपोर्टनूसार अतिरिक्त रक्तस्राव आणि शरीरातील मुख्य अवयव क्षतिग्रस्त झाल्याने या चौघांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. आरोपी चेतन सिंह याला घटनेनंतर बोरीवली स्थानकातून पळून जात असताना अटक करण्यात आली आहे. 31 जुलै रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास जयपूर सुपरफास्ट एक्सप्रेसमध्ये पालघर दरम्यान बोगी क्र. 5 मध्ये ही घटना घडली. आरपीएफचा जवान चेतन सिंह याची एएसआय टीकाराम मीणा यांच्याशी ड्यूटीवरुन वाद झाले. दोघांमध्ये वाद झाल्याने रागाच्या भरात चेतन सिंह याने आपल्या अत्याधुनिक रायफलीतून अंधाधुंद फायरिंग केली.
पोस्टमार्टेममधून हिंस्र रुपाचे दर्शन
आरोपी चेतन सिंह मानसिकदृष्ट्या आजारी होता. मुंबईला येणाऱ्या जयपूर सुपरफास्ट एक्सप्रेसमध्ये एस्कॉर्ट ड्यूटी प्रभारी एएसआय टीकाराम मीणा यांना चेतन सिंह याने गोळ्या घातल्या. त्यानंतरही त्याचा राग शांत झाला नाही. त्याने अन्य बोगीत जाऊन कोणताही दोष नसणाऱ्या निष्पाप प्रवाशांना टार्गेट केले. पोस्टमार्टेम अहवालात त्याचे कौर्य स्पष्ट होते. ज्या तीन प्रवाशांना त्यांनी गोळ्या घातल्या त्या त्यांच्या डोक्यात आणि छातीत घातल्या. यात घटनेत ते जीवंत राहण्याची कोणतीही संधी राहू दिली नाही. एका प्रवाशाला तीन गोळ्या घातल्या. उर्वरित दोघांना प्रत्येकी दोन गोळ्या घातल्या.