Shrikant Deshmukh : सोलापूर महिला दुष्कर्म प्रकरण, भाजपचे बडतर्फ जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
उच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी श्रीकांत देशमुख यांच्याकडे दोन दिवसाची संधी असणार आहे. जर 26 तारखेपर्यंत उच्च न्यायालयाचे आदेश न आणल्यास आरोपीला अटक होऊ शकते.
सोलापूर : महिलेशी दुष्कर्म केल्याप्रकरणी बडतर्फ असलेले भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख (Shrikant Deshmukh) यांचा अटकपूर्व जामीन अर्ज (Bail Application) न्यायालयाने फेटाळला आहे. सोलापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयाने श्रीकांत देशमुख यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला (Rejected) आहे. लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार केल्याच्या आरोपातून श्रीकांत देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल आहे. याच प्रकरणात अटकेपासून वाचण्यासाठी श्रीकांत देशमुख यांनी सोलापूर न्यायालयात दाद मागितली होती. आरोपी हा राजकीय पक्षाशी संबंधित असून पळून जाण्याची, पुरावे नष्ट करण्याची शक्यता असल्याचा युक्तिवाद सरकारी पक्षातर्फे करण्यात आला. न्यायालयाने हा युक्तिवाद ग्राह्य धरत श्रीकांत देशमुख यांचा अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर केला.
मात्र उच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी श्रीकांत देशमुख यांच्याकडे दोन दिवसाची संधी असणार आहे. जर 26 तारखेपर्यंत उच्च न्यायालयाचे आदेश न आणल्यास आरोपीला अटक होऊ शकते, अशी माहिती जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंह राजपूत यांनी दिली.
लग्नाचे आमिष दाखवून महिलेचे लैंगिक शोषण केले
श्रीकांत देशमुख यांच्याविरुद्ध पिडीत महिलेने तक्रार दिल्यानंतर पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्यात लैंगिक शोषण आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. श्रीकांत देशमुख यांनी आपल्यासोबत पुण्यातील डेक्कन भागातील एका हॉटेलमधे, मुंबईतील खेतवाडी भागातील एका हॉटेलमधे, सोलापूरमधील शासकीय विश्रामगृहात आणि सांगलीतील खासदार संजय पाटील यांच्या हॉटेलमधे वेळोवेळी शरीर संबंध ठेवल्याचे पिडीत महिलेने तक्रारीत म्हटलंय. श्रीकांत देशमुख सोबत आपली आधीपासून ओळख होती. आपण मुंबई भाजप शहर युवा मोर्चा जनरल सेक्रेटरी युवती सेल पदावर काम करत असताना श्रीकांत देशमुख यांच्यासोबत आपली ओळख वाढत गेली. श्रीकांत देशमुख यांनी आपल्याला तुळजापुरच्या मंदिरात लग्नाचे आश्वासन दिले होते. पण नंतर आपल्याला फसवल्याचं पिडीत महिलेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. (Sacked BJP district president Srikant Deshmukhs pre-arrest bail application rejected)