Sangli Second Murder : सांगलीत हत्यासत्र सुरुच! अज्ञातांकडून तरुणावर धारदार शस्त्राने वार; पोलिसांसमोर आव्हान
सांगलीत मंगळवारी संध्याकाळी जिल्हा रुग्णालय आणि एसटी स्टँड रोडवर अज्ञात हल्लेखोरांनी एका तरुणावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू झाला असून या तरुणाचं नाव रोहन नाईक होतं. रोहनची हत्या कुणी आणि का केली याचा तपास आता सांगली पोलीस करत आहेत.
सांगली : सलग दुसऱ्या दिवशी घडलेल्या हत्येच्या घटनेमुळे सांगली शहर (Sangli City) हादरलंय. सोमवारी रात्री हरिपूरमध्ये टोळक्यानं पती-पत्नीवर खुनी हल्ला केल्यानंतर मंगळवारी संध्याकाळी सिव्हिल स्टँड रोडवर अज्ञात हल्लेखोरांनी एका तरुणावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू झाला असून या तरुणाचं नाव रोहन नाईक (Rohan Naik) होतं. रोहनची हत्या कुणी आणि का केली याचा तपास आता सांगली पोलीस करत आहेत. मात्र सगल दोन दिवस झालेल्या हत्येच्या घटनांमुळे सांगली पोलिसांसमोर (Sangli Police) मोठं आव्हान निर्माण झालं आहे. तर या हत्यासत्रांमुळे सांगलीकरांच्या मनात एक भीतीचं वातावरण तयार झालंय.
सांगली जिल्हा रुग्णालय आणि एसटी स्टँड रोडवर अज्ञात हल्लेखोरांकडून रोहन नाईक या तरुणावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. धारदार शस्त्रासर हल्लेखोरांनी रोहनवर दगडानेही हल्ला केला. या हल्यात रोहनचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच सांगली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर मृतदेह शासकीय जिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. मात्र, हत्येचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. तसंच हत्येच्या घटनेमुळे सांगलीत दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
सोमवारी आरटीओ एजंटची हत्या, पत्नी गंभीर जखमी
दरम्यान, सोमवारी सांगलीतील हरिपूरमध्ये दाम्पत्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. या हल्ल्यात पतीचा मृत्यू झाला आहे, तर पत्नी गंभीर जखमी झाली. सुरेश नांद्रेकर असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. ते आरटीओ एजंट म्हणून काम करत होते. सांगलीच्या हरिपूर रोडवरील गजानन कॉलनीमध्ये सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती आहे. तरुणांच्या टोळक्याने पती-पत्नीवर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप आहे. सांगली ग्रामीण पोलिसांचे पथक हल्लेखोरांच्या शोधात आहे. सांगली जिल्ह्यात मिरज तालुक्यातील हरिपूर येथील सुरेश नांद्रेकर (वय 47 वर्ष) यांची हत्या करण्यात आली. तिघा हल्लेखोरांनी डोक्यावर आणि तोंडावर वार करुन त्यांचा खून केल्याचा आरोप आहे.
पतीचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न, पत्नी गंभीर जखमी
सोमवारी रात्री उशिरा हरिपूर रस्त्यावरील गजानन कॉलनीत नांद्रेकर यांच्या शेताजवळ हा प्रकार घडला. टोळक्याच्या हल्ल्यात पतीचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न करणारी सुरेश नांद्रेकर यांची पत्नीही यात गंभीर जखमी झाली आहे. सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात या प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे.
इतर बातम्या :