Sanjay Sanap: आरोग्य भरतीचे पेपर मंगल कार्यालयात वाटले, विद्यार्थ्यामागं 1 ते दीड लाख, संजय सानपच्या राजकीय कनेक्शनमुळं खळबळ
आरोग्य विभाग भरती परीक्षेतील घोटाळ्याप्रकरणी मराठवाड्यातील आरोपींची संख्या वाढलीय. संजय सानप हा भाजयुमोचा माजी पदाधिकारी आणि विद्यमान उपसरपंच असल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
मुंबई : पुणे पोलिसांकडून आरोग्य विभागाच्या गट क आणि गट ड भरती परीक्षेतील गैरप्रकाराचा शोध सुरु आहे. पुणे सायबर पोलिसांनी सोमवारी आरोग्य विभागाच्या परीक्षेत गैरव्यवहार करणाऱ्या बीडच्या संजय शाहुराव सानप याला अटक केलीय. बीडच्या पाटोदा तालुक्यातील वडझरी येथून त्याला ताब्यात घेण्यात आले. यामुळं आरोग्य विभाग भरती परीक्षेतील घोटाळ्याप्रकरणी मराठवाड्यातील आरोपींची संख्या वाढलीय. संजय सानप हा भाजयुमोचा माजी पदाधिकारी आणि विद्यमान उपसरपंच असल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
आरोग्य विभागाच्या पेपरचं मंगलकार्यालयात वाटप
आरोग्य विभागाच्या तांत्रिक विभागाचा सहसंचालक महेश सत्यवान बोटले यानं परीक्षेपूर्वी एक महिना अगोदर पेपर फोडला होता. या पेपरचं वाटप संजय सानप यानं बीड मधल्या एका मंगलकार्यालयात वाटला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
प्रत्येक विद्यार्थ्याकडून 1 ते दीड लाख रुपयांची कमाई
संजय सानप यानं पेपर फोडण्याच्या बदल्यात प्रत्येक विद्यार्थ्याकडून 1 ते दीड लाख रुपये घेतल्याची माहिती आहे. एक पेपर शंभर ते दीडशे जणांना देण्यात आल्याची माहिती आहे. संजय सानपच्या अटकेनिमित्त आरोग्य विभाग भरती परीक्षेतील रॅकेट उच्च स्तरीय अधिकाऱ्यांपासून ग्रामीण भागात पसरल्याची धक्कादायक बाब या निमित्तानं समोर आली आहे.
संजय सानपचे भाऊ आरोग्य विभागात नोकरीला?
आरोग्य सेवा गट ड परीक्षेत गैरव्यवहार करण्यात आल्याच्या आरोपात संजय शाहूराव सानप याचाही सहभाग आढळून आल्याने त्यालाही अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत या प्रकरणात सात जणांना अटक करण्यात आलीय. तर, संजय सानप याचे तीन भाऊ आरोग्य विभागात नोकरीला असल्याची माहिती आहे. आरोग्य विभागाच्या भरती प्रक्रियेतील गैरप्रकाराबद्दल अटकेत असलेला राजेंद्र सानप आणि संजय सानप हे दोघे एकाच गावचे असल्याचंही समोर आलंय.
संजय सानपचं राजकीय कनेक्शन
पुणे सायबर पोलिसांनी अटक केलेला संजय सानप हा भारतीय जनता युवा मोर्चाचा माजी पदाधिकारी आहे. संजय सानप हा सध्या वडझरीचा विद्यमान उपसरपंच आहे. संजय सानपचं बीड शहरात देखील निवासस्थान आहे. दरम्यान, संजय सानपच्या अटकेनं राजकीय गोटात मोठी खळबळ उडाली आहे. सानप याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
पेपरफुटीचं केंद्र बीडमध्ये?
पुणे सायबर पोलिसांनी आतापर्यंत आरोग्य भरती घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार महेश बोटले, खलाशी प्रकाश मिसाळ हे दोघे सोडले असता इतर आरोपही हे मराठवाड्यातील आहेत. औरंगाबाद, जालना, बीड, बुलडाणा येथील आहेत. बीडमधील 8 आरोपींना अटक झाल्यानं पेपरफुटींच केंद्र बीड झालंय का असा प्रश्न उपस्थित होतोय.
इतर बातम्या:
Sanjay Sanap ex BJYM Office bearer arrested by Pune Police in connection with Health Department exam scam case