Santosh Deshmukh Case : आक्रोश मोर्चात संतोष देशमुखांच्या मुलीचे शब्द ऐकून सगळेच गहिवरले
Santosh Deshmukh Case : सध्या सगळ्या राज्यात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची चर्चा आहे. अत्यंत क्रूर पद्धतीने ही हत्या करण्यात आली. बीड जिल्ह्यातील रेणापूर येथे आज, संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा, तसच मुख्य आरोपीला अटक करावी, या मागणीसाठी आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचे शब्द ऐकून सगळेच हळहळले.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा, तसच मुख्य आरोपीला अटक करावी, या मागणीसाठी बीड जिल्ह्यातीत रेणापूर येथे आज आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात संतोष देशमुख यांची दोन्ही मुलं सहभागी झाली होती. संतोष देशमुख यांची कन्या वैभवी मंचावर भावूक झाली होती. मोर्चेकऱ्यांसमोर वैभवी भाषण करताने जे बोलली, त्याने सगळेच हळहळले. “तुम्ही इथे आलात, तुमची संख्या बघून काय बोलावं ते सुचत नाहीय. तुम्ही असेच खंबीरपणे आमच्यामागे उभे राहा अशी विनंती करते. आज दु:खाच प्रसंग आहे, तुम्ही सर्व आमचं दु:ख वाटून घेण्यासाठी आला आहात” असं वैभवी म्हणाली.
“माझ्या वडिलांसोबत काय झालं, हे तुम्हा सर्वांना माहित आहे. त्यांची क्रूर हत्या झाली. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही सर्व मोठ्या संख्येने आलात तसेच कायम आमच्यासोबत राहा. आज आमचं छत्र हिरावलं आहे, दुसऱ्या कुठल्या मुला-मुलीसोबत असं होऊ नये, आज आमच्या कुटुंबावर जी वेळ आली, तशी वेळ पुन्हा कुठल्या कुटुंबावर येऊ नये” असं वैभवी म्हणाली.
‘कुटुंब म्हणून सोबत राहा’
“माझे वडिल समाजसेवक होते. त्यांनी आजपर्यंत समाजासाठी सर्वकाही केलं. गावामध्ये स्वच्छता अभियान राबवलं. आमच्या ग्रामपंचायतीला अनेक पुरस्कार मिळाले. माझे वडिलं, ज्यांना दारुच व्यसन आहे, ते व्यसन सोडवण्यासाठी प्रयत्न करत होते. तुम्ही असेच आमच्या पाठिशी राहा, कुटुंब म्हणून सोबत राहा” असं वैभवी म्हणाली.
‘न्याय द्या, न्याय द्या संतोष देशमुखला न्याय द्या’
“मी तुम्हाला माझ्या परिवाराचा हिस्सा मानते. प्रत्येक मोर्चाला या, माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या. जे आरोपी आहेत, त्यांना लवकरात लवकर अटक झाली पाहिजे. माझ्या वडिलांसोबत जो गुन्हा झाला, तो पुन्हा घडू नये याची दक्षता घ्या. माझे वडिल आम्हाला सोडून गेलेत. तुम्ही एक कुटुंब म्हणून साथ द्या, सदैव आमच्या पाठिशी उभे राहा” असं वैभवी म्हणाली. मोर्चाला आलेले लोक ‘न्याय द्या, न्याय द्या संतोष देशमुखला न्याय द्या’ अशा घोषणा देत होते.