उज्जैन | 21 सप्टेंबर 2023 : आयुष्य हे क्षणभंगूर आहे. याचा प्रत्यय वारंवार येत असतो. तुम्ही जे ठरवता, जे प्लॅनिंग करता उद्या तसं घडेलच याची शाश्वती नसते. एवढेच कशाला उद्या उगवेल याची काही हमीही नसते. सर्व प्लॅनिंग फोल होतात. असं काही आयुष्यात घडतं की होत्याचं नव्हतं होतं. एक वादळ येतं आणि सर्व पालापाचोळा वाहून जातो. एका हसत्या खेळत्या घरातही तेच घडलं. कालपर्यंत सर्वकाही आनंदी आनंद होता. पण आज त्या घराचं स्मशान झालंय. काय झालं त्या घरात? एका दिवसात असं काय बदललं?
मध्य प्रदेशातली उज्जैनमध्ये गुरुवारी सकाळी सर्वांनाच हादरवून टाकणारी घटना घडली आहे. येथील एका संपूर्ण कुटुंबानेच जीवन संपवलं आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या कुटुंबाला भेटण्यासाठी एक तरुण आला होता. जेव्हा कोणीच दरवाजा उघडत नसल्याचं लक्षात आलं तेव्हा काही तरी घडल्याचा त्याला संशय आला. त्यानंतर त्याने शेजाऱ्यांना त्याची माहिती दिली. शेजाऱ्यांनी खिडकीतून आतील दृश्य पाहिलं तेव्हा त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली. घरात चार मृतदेह पडलेले होते.
उज्जैनमधील जिवाजीगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जानकीनगरमध्ये ही घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तीन महिन्यापूर्वीच मनोज त्याची पत्नी ममता, मुलगा लक्की आणि मुलगी कनक सोबत या ठिकाणी राहायला आले होते. मनोज हा गढकालिका मंदिर आणि आसपासच्या परिसरात फूल आणि खेळण्याची दुकान लावत होता. आज सकाळी सर्व लोक नेहमीप्रमाणे कामाला लागले होते. मनोजला भेटायला त्याचा एक मित्र गोलू त्याला भेटायला आला होता.
त्याने बराच वेळ मनोजच्या घराचा दरवाजा ठोठावला. पण आतून काहीच आवाज आला नाही. घर तर आतून बंद होतं. कुणीच बोलत नव्हतं. त्यामुळे त्याला संशय आला. मनात पाल चुकचुकली. काही अनर्थ तर घडला नाही ना? अशी मनात शंका आली आणि त्याने शेजाऱ्यांना बोलावून दरवाजा उघडत नसल्याचं सांगितलं.
या घराचा मालक आसाराम आणि शेजारी राहणारे लोक आले. त्यांनीही बराच वेळ दरवाजा ठोठावला. पण काहीच आवाज आला नाही. त्यानंतर या लोकांनी खिडकीतून डोकावून पाहिलं. समोर जे दिसलं त्याने त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली. मनोज घरात पंख्याला लटकलेला होता. तर त्याची पत्नी ममता, मुलगा लक्की आणि मुलगी कनक यांचा मृतदेह जमिनीवर पडलेला होता.
त्यांच्या तोंडातून फेस आलेला होता. या घटनेची तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी या घटनेचा तात्काळ पंचनामा केला. मृतदेह रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले.
पोलिसांनी मनोजच्या घराचा कोपरा न् कोपरा तपासला. पोलिसांना घरात काहीच संशयास्पद वस्तू मिळाली नाही. सुसाईड नोटही मिळाली नाही. मनोजवर प्रचंड कर्ज होतं. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून तो त्रस्त होता. शेजारील लोकांनी त्याच्या कर्जाची माहिती पोलिसांना दिली. आता पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.
पोलिसांनी अधिक तपास केला असता मनोजने काही वर्षापूर्वी ममताशी प्रेमविवाह केल्याचं उघड झालं. यापूर्वी ममताचा विवाह झालेला होता. लक्की आणि कनक ही दोन्ही मुलं ममताला पहिल्या पतीपासून झालेली आहेत. त्यामुळे आता पोलीस विविध अँगलने या प्रकरणाचा तपास करत आहे.