Sharad Mohol Murder | शरद मोहोळच्या हत्येनंतर मुख्य आरोपीने घेतलं देवदर्शन, फरार असताना गणेश मारणे कुठे-कुठे गेला ?
शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी, मास्टरमाईंड गणेश मारणे हा फरार होता. अखेर महिनाभर तपास करून, शोध घेऊन सिनस्टाईल पाठलाग करत गणेश मारणेला 1 फेब्रुवारी रोजी नाशिकरोड येथून बेड्या ठोकण्यात आल्या

प्रदीप कापसे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, पुणे |3 फेब्रुवारी 2024 : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळच्या हत्येला आता जवळपास महिना झाला आहे. गँगवॉरमधून पाच जानेवारी रोजी शरद मोहोळची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पुणे पोलिसांनी 24 तासांत 8 आरोपींना अटक केली. जसजसा या प्रकरणाचा तपास पुढे सरकला, त्यानंतर एकूण 15 आरोपींना अटक झाली , ज्यामध्ये दोन वकिलांचा समावेश होता. मात्र तरीही या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी, मास्टरमाईंड गणेश मारणे हा फरार होता. अखेर महिनाभर तपास करून, शोध घेऊन सिनस्टाईल पाठलाग करत गणेश मारणेला 1 फेब्रुवारी रोजी नाशिकरोड येथून बेड्या ठोकण्यात आल्या. त्याच्यासह आणखी तिघांनाही अटक करण्यात आली.
हत्येनंतर केलं देवदर्शन
आरोपी गणेश मारणेला ताब्यात घेतल्यानंतर पोलिस त्याची कसून चौकशी करत असून रोज नवनवी माहिती समोर येत आहे. शरद मोहोळच्या हत्येनंतर गणेश मारणे हा तातडीने फरार झाला. पोलिसांच्या कचाट्यात सापडू नये म्हणून तो वेगवेगळ्या ठिकाणी फिरत होता. एवढंच नव्हे तर या हत्येनंतर फरार असताना त्याने अनेक ठिकाणी जाऊन देवदर्शन केल्याची माहिती समोर आली आहे. सुरूवातीला गणेश मारणे हा तुळजापूरला गेला आणि तेथील मंदिरात जाऊन त्याने दर्शन घेतल्याची माहिती तपासात उघड झाली आहे.




तेथून तो कर्नाटकला गेला, मात्र तेथेही पोलिसांचं पथक पोहोचल्यामुळे त्यांना चकवण्यासाठी गणेश मारणे कर्नाटकमधून केरळला पळाला. तेथेही त्याने विविध मंदिरात जाऊन देवाचं दर्शन घेतल्याचं उघड झालं आहे. शरद मोहोळच्या हत्येनंतर जवळपास 25 दिवस गणेश मारणे फरार होता, पोलिसांना चकवत तो चार राज्यात फिरला.
असा अडकला जाळ्यात
गणेश मारणे याच्या प्रत्येक हालचालींवर पुणे पोलीस लक्ष ठेऊन होते. केरळमधून देवदर्शन करुन तो नाशिकला आला. तंत्रज्ञानाच्या मदतीने पोलिस त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवत त्याचा ठावठिकाणा शोधत होते. नाशिकमध्ये असताना त्याने ओला बुकिंग रद्द केल्यावर पोलिसांना त्याचा नंबर ट्रेस करता आला. तो लोणावळा येथे वकिलांना भेटायला जात असताना त्याला पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. गणेश मारणे फरार असताना त्याने ज्या बाईक्सचा वापर केला, त्याही पोलिसांनी जप्त केल्या आहेत. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
गणेश मारणे हा शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असून तो गेल्या अनेक दिवसांपासून फरार होता. पुणे पोलिसांनी शरद मोहोळ हत्याप्रकरणी आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई केली आहे. त्यात गणेश मारणे याचाही समावेश आहे.
गणेश मारणेपासून जीवाला धोका, शरद मोहोळच्या पत्नीचा दावा
दरम्यान शरद मोहोळ हत्याप्रकरणी त्याची पत्नी स्वाती हिने पोलिस जबाबात दिला आहे. त्यात धक्कादायक दावा केला आहे. गणेश मारणे आणि विठ्ठल शेलार याच्यापासून जिवाला धोका असल्याचा दावा केला आहे. यामुळे मोहोळ कुटुंबियांच्या जीवावर कोण उठले आहे? हा प्रश्न निर्माण झाला आहे.