श्रद्धा हत्या प्रकरणात तीन हजार पानांचे आरोपपत्र, काय म्हटले आहे चार्जशीटमध्ये वाचा
श्रद्धा हत्याकांडप्रकरणी दिल्ली पोलिसांनी तीन हजार पानांचे आरोपपत्र तयार केले आहे. या आरोपपत्रात नार्को टेस्ट, पॉलीग्राफी आणि डीएनए टेस्टचा अहवालही समाविष्ट करण्यात आला आहे.
मुंबई : वसईतील श्रद्धा वालकर (Shraddha Walkar Murder News) या तरुणीच्या दिल्लीत (Delhi Murder Case) झालेल्या हत्या प्रकरणाचा पोलिसांचा तपास पुर्ण झाला आहे. श्रद्धा हत्याकांडप्रकरणी दिल्ली पोलिसांनी तीन हजार पानांचे आरोपपत्र तयार केले आहे. या आरोपपत्रात नार्को टेस्ट, पॉलीग्राफी आणि डीएनए टेस्टचा अहवालही समाविष्ट करण्यात आला आहे. तसेच १०० पेक्षा जास्त साक्षीदारांचे जबाबही नोंदवले आहेत. आरोपपत्रात कोणत्याही त्रुटी राहू नये म्हणून ते कायदेतज्ज्ञांचा टीमकडे पाठवण्यात आले आहे. पुढच्या दोन दिवसांत आरोपपत्र न्यायालात दाखल होणार आहे. १८ मे रोजी श्रद्धा वालकर या तरुणीची तिचा लिव्ह इन पार्टनर आफताब पुनावाला (Aftab Poonawala) याने हत्या केली होती. आफताबने हत्येची कबुलीही दिली आहे.
दिल्लीतील पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, श्रद्धा हत्याकांडाचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपपत्र मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये घटनेशी संबंधित प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. जंगलातून सापडलेल्या हाडांच्या डीएनए अहवालासोबतच पोलिसांनी आरोपी आफताबच्या नार्को आणि पॉलीग्राफ चाचणी आणि इतर फॉरेन्सिक चाचण्यांचा अहवालही आरोपपत्रात जोडले आहे. पोलिसांनीही साक्षीदारांच्या जबाबातून हा संपूर्ण प्रकार सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कायदेतज्ज्ञांचे मत जाणून घेतल्यानंतर पोलीस याच आठवड्यात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले जाईल. सध्या एकही प्रश्न शिल्लक नाही, ज्याची उत्तरे या आरोपपत्रात नाहीत.
पोस्टमार्टमच्या अहवाल काय
श्रद्धा वालकरच्या २३ हाडांचे पोस्टमार्टन विश्लेषण करण्यात आले. त्याचा अहवाल पोलिसांना मिळाला आहे. डीएनए टेस्टमध्ये ही हाडे श्रद्धाची असल्याचा अहवाल आला होता. डीएनए अहवालासाठी श्रद्धाच्या वडिलांचे सॅम्पल वापरण्यात आले होते. ती हाडे श्रद्धाची असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर एम्समध्ये त्याचे विश्लेषण केले गेले. या विश्लेषणात करवतीने हाडे कापल्याचे स्पष्ट झाले. करवतीचे निशानही त्यावर सापडले आहे.
काय प्रकरण?
आफताब पुनावाला याच्यावर श्रद्धा वालकर हिचा खून केल्याचा आरोप आहे. श्रद्धा वालकर हिची गळा दाबून हत्या केल्यानंतर आफताब याने तिच्या शरीराचे तब्बल ३५ तुकडे केले होते. त्यानंतर हेच तुकडे त्याने वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले. हत्या केल्यानंतर त्याचे पुरावे मिटवले होते. दरम्यान, मे महिन्यात झालेल्या या हत्याकांड प्रकरणानंतर थेट सहा महिन्यांनी म्हणजेच नोव्हेंबर महिन्यात आफताब याला अटक करण्यात आली होती.