Shraddha Murder Case : तिला आधीच हत्येचा अंदाज आला होता, पोलिसांकडे तक्रारही केली, पण एक चूक…
आफताब आपल्याला शिवीगाळ करतो. मारहाण करतो. आज त्याने माझ्या हत्येचा प्रयत्न केला. माझ्या शरीराचे तुकडे तुकडे करून फेकून देण्याची त्याने मला धमकी दिली.
नवी दिल्ली: श्रद्धा वालकर हत्याकांडप्रकरणी अजून एक माहिती समोर आली आहे. श्रद्धाने आधीच आपल्या मृत्यूची शंका वर्तवली होती. तिने आफताबचा असली चेहरा ओळखला होता. तुझे तुकडे तुकडे करेन अशी धमकी तो तिला द्यायचा. त्यामुळे तिने नोव्हेंबर 2020मध्ये त्याच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार केली होती. आपल्या जीवाला धोका असल्याचं तिने पोलिसांना सांगितलं होतं. पण पोलिसांनी आफताबवर कारवाई करण्यापूर्वीच तिने तक्रार मागे घेतली आणि पुढे जे नको घडायचं तेच घडलं. तिच्या एका चुकीमुळे तिला प्राणाला मुकावं लागलं.
श्रद्धा वालकरने दोन वर्षापूर्वी आफताबच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. आफताबकडून आपल्या जीवाला धोका असल्याचं तिने तक्रारीत म्हटलं होतं. आफताब शरीराचे तुकडे तुकडे करण्याचे धमकी देत असल्याचंही तिने म्हटलं होतं. श्रद्धाने मुंबईतील तुळिंज पोलीस ठाण्यात ही तक्रार केल होती.
आफताब आपल्याला शिवीगाळ करतो. मारहाण करतो. आज त्याने माझ्या हत्येचा प्रयत्न केला. माझ्या शरीराचे तुकडे तुकडे करून फेकून देण्याची त्याने मला धमकी दिली. गेल्या सहा महिन्यांपासून तो मला मारहाण करत आहे, असं तिने या तक्रारीत म्हटलं होतं.
तो मला मारहाण करतो, मला जीवे मारण्याचा त्याने प्रयत्न केला होता हे त्याच्या कुटुंबीयांनाही माहीत आहे. आता त्याच्यासोबत राहण्याची माझी इच्छा नाहीये. तो मला ब्लॅकमेल करत आहे. अशावेळी मला जर काही झालं तर त्याला तोच जबाबदार असेल, असं तिने तक्रारीत म्हटलं आहे.
या तक्रारीनंतर पोलिसांनी चौकशी सुरू केली होती. पण नंतर माझी कुणाबद्दल तक्रार नाहीये, असं श्रद्धाने सांगितलं. तिने तिची तक्रार परत घेतली होती. आफताबने तिला समजावल्यानंतर तिने तक्रार मागे घेतली. त्यानंतर दोघे पुन्हा एकत्र राहत होते, असं डीसीपी सुहास भावचे यांनी सांगितलं. आजतकला त्यांनी ही माहिती दिली.
आफताब सातत्याने श्रद्धाला मारहाण करत होता. यापूर्वीही तिने आफताबला वैतागून मे 2020मध्ये दोन मित्रांना मदत मागितली होती.
आफताबने श्रद्धाला 14 वेळा मारहाण केली होती. त्यामुळे तिचा आफताबवरचा विश्वास उडाला होता. आफताबने तिला धमकावलं असेल. त्यामुळेच तिने आफताब विरोधातील तक्रार मागे घेतली असावी, असं श्रद्धाच्या वडिलांनी आजतकला सांगितलं.