तब्बल 55 लाखांची चोरी करून बनवले इन्स्टाग्राम रील्स; दोघी बहिणी अटकेत
हल्ली इन्स्टाग्राम रील्स बनवण्याची खूप क्रेझ नेटकऱ्यांमध्ये पहायला मिळते. मात्र याच रील्सच्या मदतीने पोलिसांनी चोरीची उघड केली आहे. एका वृद्ध दाम्पत्याच्या घरी काम करणाऱ्या दोघा बहिणींनी तब्बल 55 लाख रुपयांची चोरी केली.
मुंबई पोलिसांनी इन्स्टाग्राम रीलच्या मदतीने 55 लाख रुपयांच्या चोरीचा खुलासा केला आहे. पोलिसांनी दोन बहिणींना अटक केली. या दोघी बहिणी एका वृद्ध दाम्पत्याच्या घरी काम करत होत्या. दोघींनी प्लॅन आखून वृद्ध दाम्पत्याच्या घरातून 55 लाख रुपयांचे दागिने, महागडे कपडे आणि इतर मौल्यवान सामानांची चोरी केली. त्यानंतर तेच महागडे कपडे आणि दागिने परिधान करून त्यांनी रील व्हिडीओ बनवला आणि सोशल मीडियावर अपलोड केला. याच रीलच्या मदतीने पोलिसांनी चोरीच्या घटनेवरून पडदा उचलला. मुंबईतील काळाचौकी पोलिसांनी या दोन बहिणींना अटक केली आहे. त्यापैकी एकीचं नाव छाया वेतकोळी असून ती 24 वर्षांची आहे. तर दुसरीचं नाव भारती वेतकोळी असून ती 21 वर्षांची आहे.
चोरीचे दागिने, कपडे परिधान करून बनवले रील्स
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वृद्ध दाम्पत्याला घरातील मौल्यवान दागिने आणि कपडे गायब झाल्याचं कळताच त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांकडे नोंदवलेल्या जबाबात त्यांनी घरात काम करण्यासाठी येणाऱ्या दोन बहिणींचा उल्लेख केला. याप्रकरणी अधिक तपास केला असता पोलिसांच्या निदर्शनास आलं की त्या दोघी बहिणी नेहमी दाम्पत्याच्या घरातील दागिने आणि कपडे परिधान करून रील्स अपलोड करायच्या. पोलिसांनी आधी वृद्ध दाम्पत्याकडून दागिने आणि कपड्यांची ओळख पटवून घेतली. त्यानंतर दोघी बहिणींचं लोकेशन ट्रेस केल्यावर त्या रायगडमध्ये असल्याचं समजलं.
बहिणींविरोधात गुन्हा दाखल
छाया आणि भारती वेतकोळी या बहिणींना पोलिसांनी रायगडमधून अटक केली आणि त्यांच्याकडे असलेले 55 लाख रुपयांचे दागिने आणि कपडे जप्त केले. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही बहिणींविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 381 आणि इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलिसांकडून दोघींची चौकशी सुरू आहे. त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.