घर जावई बनणार नाही… वडिलांच्या वक्तव्याचा राग आल्याने मुलाने उचलले टोकाचे पाऊल, मारहाण करून….
वडिलांनी आईचं म्हणणं ऐकलं नाही म्हणून मुलगा संतापला आणि त्याने जन्मदात्या वडिलांनाच मारहाण केल्याचे समोर आले आहे.
जोधपूर | 25 ऑगस्ट 2023 : राजस्थानच्या जोधपूरमध्ये पोलिसांनी एक धक्कादायक हत्येचा खुलासा केला आहे. तेथे एका मुलाने आपल्या मित्रासह वडिलांची निर्घृण हत्या (murder) केली. या हत्येतील आरोपी मित्राला पोलिसांनी अटक केली असली तरी आरोपी मुलगा फरार झाला असून त्याचा शोध सुरू आहे. मिळालेल्या माहतीनुसार, आरोपी मुलाच्या आई-वडिलांचे (dispute in couple) सतत भांडण, वाद होत असे त्यामुळे तो वैतागला होता. वादामुळे ते दोघेही वेगळे रहात होते.
आपल्या पतीने घर जावई बनून रहावे, अशी पत्नीची इच्छा होती. मात्र पतीला ते बिलकूल मान्य नव्हते, अन त्याच मुद्यावरून त्यांच्यामध्ये सतत वाद होत असतं. ज्यामुळे आरोपी मुलगा वैतागला होता.
नक्की काय झालं ?
हे धक्कादायक प्रकरण जोधपूरच्या ओसियन भागातील शिवनगर गावातील आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवनगर ते एकलखोरी कडे जाणाऱ्या मार्गावर एक मृतदेह पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता शैतान राम विश्नोई असे मृताचे नाव आहे. यानंतर पोलिसांनी या घटनेचा तपास केला असता 21 वर्षीय मनीषने वडिलांची हत्या केल्याचे आढळून आले. त्यामध्ये कैलाश या त्याच्या 27 वर्षीय मित्राने त्याला साथ दिली होती.
मुलाने वडिलांना का मारले ?
कैलाश आणि मनीष हे दोघे नातवाईक आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मृत शैतान राम हा गेल्या तीन-साडेतीन वर्षांपासून पत्नीपासून वेगळा राहतो. त्याची पत्नी माहेरी रहात होती. त्या दोघांमध्ये बरेच वाद सुरू असल्याचेही समोर आले. त्याच्या पत्नीला भाऊ नाही, त्यामुळे ती वारंवार पतीला आपल्या पालकांसोबत घर- जावई म्हणून राहण्यास सांगत होती. पण पती, शैतान राम यासाठी तयार नव्हता. याचा राग शैतान रामचा मुलगा मनीषलाही होता. शैतान रामची मुलगीही तिच्या आईच्याच बाजूने होती.
मनीष व्यसनी झाला होता, त्याने शिक्षणही अर्धवट सोडले होते. तो आईसोबतच आजी-आजोबांकडे रहायचा. तर त्याची बहीण सुरतगडमध्ये राहून स्पर्धा परीक्षेची तयारी करत होती. आई-वडिलांचे नेहमीचे भांडण मनिषला आवडत नव्हते म्हणूनच त्याने वडिलांना मारहाण करून त्याची हत्या केली व तो फरार झाला. याप्रकरणाातील आणखी आरोपी कैलाश आणि मृताची पत्नी हिला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. फरार मुलाचा शोध सुरू आहे.