अंबरनाथमधील अंदाधुंद गोळीबार प्रकरण, पंढरीनाथ फडके यांचा जामीन फेटाळला !
अंबरनाथमधील अंदाधुंद गोळीबार प्रकरणी बैलगाडा शर्यतीचे अध्यक्ष पंढरीनाथ फडके यांना दिला नाहीच. विशेष मोक्का न्यायालयाने फडके यांचा जामीन फेटाळला.
अंबरनाथ / निनाद करमरकर : अंबरनाथमध्ये नोव्हेंबर महिन्यात बैलगाडा शर्यतीच्या वादातून अंदाधुंद गोळीबार झाला होता. या प्रकरणातील प्रमुख आरोपी असलेले महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष पंढरीनाथ फडके यांचा जामीन विशेष मोक्का न्यायालयाने फेटाळला आहे. फडके यांच्या वकिलांनी ठाण्याच्या विशेष मोक्का न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र हा अर्ज आज न्यायालयाने फेटाळून लावला. त्यामुळे फडके हे आता जामिनासाठी उच्च न्यायालयात जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
बैलगाडा शर्यतीच्या वादातून झाला होता गोळीबार
अंबरनाथमध्ये 13 नोव्हेंबर रोजी बैलगाडा शर्यतीच्या वादातून पनवेलचे पंढरीनाथ फडके यांच्या गटाने कल्याणच्या राहुल पाटील गटावर अंदाधुंद गोळीबार केला होता. याप्रकरणी पंढरीनाथ फडके यांच्यासह एकूण 32 जणांवर हत्येचा प्रयत्न, आर्म्स ऍक्ट यासह मोक्का कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर फडके यांची रवानगी ठाणे कारागृहात करण्यात आली होती.
कुणाल पाटील आणि त्यांच्या भावांना जामीन देण्यात आला
कल्याण डोंबिवली महापालिकेचे माजी नगरसेवक कुणाल पाटील यांनी मला राजकीय वादातून जीवे मारण्याचा कट रचल्याचा आरोप फिर्यादी राहुल पाटील यांनी केला होता. यामुळे कुणाल पाटील आणि त्यांच्या दोन भावांचाही समावेश आरोपींमध्ये करण्यात आला होता. मात्र त्यांना न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला होता.
काय आहे प्रकरण?
कल्याणच्या आडीवली गावातील बैलगाडा मालक राहुल पाटील यांच्यावर रविवारी दुपारी अंबरनाथच्या आनंदनगर एमआयडीसीत अंदाधुंद गोळीबार करण्यात आला होता. पनवेलच्या पंढरीनाथ फडके यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी हा हल्ला केल्याचा व्हिडिओ समोर आला होता.
राहुल पाटील आणि पंढरीनाथ फडके यांच्यात बैलगाडा शर्यतीवरून वाद असल्यामुळे हा हल्ला त्याच वादातून झाल्याचं सुरुवातीला सांगितलं जात होतं. मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर हा हल्ला राजकीय स्पर्धेतून करण्यात आल्याचं करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली.