पुण्यात बैलगाडा शर्यतीला गालबोट, शेवटच्या दिवशी बैलगाडा घाटात तुफान राडा
पुण्यात पाच दिवसीय भव्य महाराष्ट्र बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. शेवटच्या दिवशी कार्यक्रमात तुफान राडा झाल्याने कार्यक्रमाला गालबोट लागले आहे.
खेड-पुणे / सुनील थिगळे : खेड तालुक्यामधील चऱ्होली येथे पाच दिवस भव्य महाराष्ट्र केसरी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र शेवटच्या दिवशी या शर्यतीला गालबोट लागल्याची घटना घडली. शेवटच्या दिवशी आणि शेवटच्या गाडा पळवल्यानंतर बैलगाडा घाटात तुफान दगडफेक करण्यात आली. बैलगाडा धावण्याच्या वेळी घड्याळ चुकीचं दाखवल्याच्या कारणावरून आयोजकांवर ही दगडफेक झाल्याचे समोर आले आहे. यानंतर घाटात तुफान राडा झाला. दगडफेक करणाऱ्यांना नागरिकांनी चोप दिला. या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ बैलगाडा घाटात दाखल होत परिस्थिती आटोक्यात आणली. याप्रकरणी पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले आहे.
खेड तालुक्यातील चऱ्होली येथे खेड पंचायत समितीचे माजी सभापती रामदास ठाकूर पाटील यांच्या सहकार्याने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. बैलगाडा शर्यतीचा शुक्रवारी शेवटचा दिवस होता. या शर्यतीचा बक्षीस वितरण समारंभ विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडणार होता. मात्र अजित पवार या कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाही. अनेक दिग्गज नेत्यांनी या स्पर्धेला भेटी देखील दिल्या होत्या. मात्र शेवटच्या दिवशी आणि शेवटच्या गाड्या वेळी हा अनुचित प्रकार घडल्याने एकच गोंधळ उडाला.
दगडफेक करणाऱ्यांना नागरिकांनी चोपले
राज्यात बैलगाडा शर्यत बंदी उठल्यानंतर गेल्या पाच दिवसांपासून या महाराष्ट्र केसरी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. शेवटच्या दिवशी अंतिम फेरीमध्ये 31 गाडे पळविण्यात येणार होते. यामध्ये एक गाडा हा मावळ तालुक्यातील असून, त्यांनीच आयोजकांवर दगडफेक केल्याची माहिती कळतेय. दगडफेक झाल्यानंतर घाटामध्ये असलेल्या नागरिकांनी संबधित गाडा मालक आणि त्यांच्या समर्थकांना बेदम चोपले.
पोलिसांच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष
या घटनेनंतर पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले असून, पोलीस त्यांच्यावर काय कारवाई करतात हे पाहणे औचित्याचे आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत आळंदी पोलीस स्टेशनमध्ये कोणतीही तक्रार दाखल झाली नव्हती. महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेप्रमाणे महाराष्ट्र केसरी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे या स्पर्धेला विशेष महत्त्व आहे. मात्र या घटनेने कार्यक्रमाला गालबोट लागले आहे. आमदार सुनील शेळके यांनी देखील यावेळी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला.