शिर्डी येथे पोलीसांनी पकडलेल्या 4 भिक्षेकऱ्यांचा मृत्यू ,नातलगांचे प्रशासनावर गंभीर आरोप
या भिक्षेकऱ्यांना एका रुममध्ये अन्न पाण्यावाचून डांबून ठेवले होते. त्यामुळे त्यांचा भूक आणि तहानेने व्याकूळ होऊन मृत्यू झाल्याचा आरोप नातलगांनी केला आहे.

शिर्डीच्या साईबाबांच्या दरबारी भिक्षेकऱ्यांचा त्रास नको म्हणून रामनवमी निमित्त पोलिसांनी मोहीम राबवून ५१ भिक्षेकऱ्यांना ताब्यात घेतले होते. या भिक्षेकऱ्यांना श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथील कारागृहात डांबून ठेवले होते. त्यातील १० भिक्षेकऱ्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना अहिल्यानगरातील जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, त्यापैकी चार जणांना मृत्यू झाल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. या भिक्षेकऱ्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या नातलगांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. या भिक्षेकऱ्यांना बांधून ठेवण्यात आले होते. त्यांच्यावर कोणत्याही उपचाराविना उपाशी डांबून ठेवल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
शिर्डी ( अहिल्यानगर ) येथील नगरपंचायत आणि पोलिसांनी शनिवारी संयुक्त कारवाई करीत 51 भिक्षेकऱ्यांना ताब्यात घेतले होते. त्यापैकी काही भिक्षेकरांना श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर कारागृहात येथे ठेवण्यात आले होते. त्यातील 10 भिक्षेकर्यांची तब्येत बिघडली. त्यामुळे त्यांना अहिल्यानगरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले गेले. मात्र त्यापैकी चार जणांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी मृतांच्या नातेवाईकांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले आहे.
साधं पाणी देखील दिले नाही
या भिक्षेकरांना एका रूममध्ये बांधून ठेवले होते. या रूमला टाळे लावण्यात आले होते. त्यांना साधं पाणी देखील देण्यात आलेले नव्हते. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे उपचार सुरू नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. जोपर्यंत विसापूर प्रशासनावर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही असे एक नातेवाईक अक्षय वाघमारे याने म्हटले आहे.




त्रास देत होते म्हणून बांधून ठेवले
यातील बरेचसे पेशंट अल्कोहोलिक होते. त्यामुळे त्यांचे हात थरथरत होते. शिवाय ते पळून जात होते. त्यांना ससून हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी रेफर करणार कसे कोणाचेही नातेवाईक ताबा घ्यायला आले नव्हते. उपचारासाठी त्रास देत होते म्हणून त्यांना बांधून ठेवण्यात आल्याचा अजब दावा अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक एन. एस. चव्हाण यांनी केला आहे. या दुर्देवी घटनेत अशोक बोरसे, सारंधर वाघमारे, प्रवीण घोरपडे , ईसार शेख या चौघांचा मृत्यू झाला आहे.