बहुचर्चीत पालममधील दुहेरी हत्याकांडाचा उलगडा; फाटलेल्या नोटा आणि पेटीएममुळे आरोपीला अटक
दिल्लीच्या पालम परिसरामध्ये घडलेल्या दुहेरी हत्याकांडाचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना अखेर यश आले आहे. अवघ्या पन्नास हजार रुपयांच्या वादातूनत भाच्यानेच आपल्या आत्याची आणि तिच्या मुलाची हत्या केल्याचे तपासात समोर आले आहे.
नवी दिल्ली : दिल्लीच्या पालम परिसरामध्ये घडलेल्या दुहेरी हत्याकांडाचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना अखेर यश आले आहे. अवघ्या पन्नास हजार रुपयांच्या वादातूनत भाच्यानेच आपल्या आत्याची आणि तिच्या मुलाची हत्या केल्याचे तपासात समोर आले आहे. भारतीय वायूसेनामध्ये अकाऊंटन असलेल्या श्रीकृष्ण स्वरूप यांच्या पत्नी आणि मुलाची काही दिवसांपूर्वी हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात अभिषेक वर्मा या तरुणाला अटक करण्यात आली आहे. या तरुणाने चौकशीदरम्यान पोलिसांना हत्येची कबूली दिली.
पोलिसांसमोर तपासाचे आव्हान
काही दिवसांपूर्वी दिल्लीच्या पालम परिसरामध्ये श्रीकृष्ण स्वरूप यांच्या पत्नी बबीता आणि मुलगा गौरव यांची हत्या करण्यात आली होती. या घटनेने परिसरात खळबळ उडाली होती. संध्याकाळी जेव्हा श्रीकृष्ण स्वरूप हे कामावरून परतले तेव्हा पत्नी आणि मुलाचा मृतदेह पाहून त्यांना धक्काच बसला. याप्रकरणी पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र आरोपीने एकही पुरावा मागे न ठेवल्याने आरोपीचा शोध घेणे पोलिसांसमोर मोठे आव्हान बनले होते.
असा झाला घटनेचा उलगडा
आरोपीने घरात लावलेल्या सीसीटीव्हीचा डीव्हीआर देखील गायब केला होता. गुन्हा दाखल केल्यानंतर अखेर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. शेजारच्या घरात लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये एक तरुण स्वरूप यांच्या घरातून बाहेर पडताना दिसत होता. त्याच्या तोंडाला रुमाल गुंडाळलेला होता. त्याच्या हातात काही तरी वस्तू दिसत होती. ही वस्तू म्हणजेच सीसीटीव्हीचे डीव्हीआर असावा असा अंदाज पोलिसांनी बांधला. त्यानंतर पोलिसांनी परीसरातील रिक्षावाल्यांकडे चौकशी केली. तर त्यातील एका रिक्षा चालकाने आपण कपड्यावर रक्ताचे डाग असलेल्या एका तरुणाला रिक्षातून सोडल्याची माहिती पोलिसांना दिली. परंतु त्याबाबत अधिक माहिती तो देऊ शकला नाही.
आरोपीने दिली हत्येची कबुली
पोलिसांनी रिक्षावाल्याकडे चौकशी केली असता, पोलिसांना आणखी एका गोष्टीची माहिती मिळाली ती म्हणजे या तरुणाकडे दहा रुपयांची फाटकी नोट होती. ही नोट घेण्यास रिक्षावाल्याने नकार दिला. तेव्हा या तरुणाने रिक्षावाल्याला पेटीएममधून पेमेंट केले. पोलिसांनी याच पेटीएम पेमेंटच्या आधारे संबंधित तरुणाचा शोध घेतला व त्याला अटक केली. चौकशीमध्ये त्याने आपण हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपी हा श्रीकृष्ण स्वरूप यांच्या पत्नी बबीता यांच्या भावाचा मुलगा होता. त्याने आत्याकडून पन्नास हजार रुपये उसने घेतले होते. पैसे मागितल्याने राग अनावर झाला आणि याचा रागातून हे दुहेरी हत्याकांड घडले,अशी माहिती आरोपीने पोलिसांना दिली.
संबंधित बातम्या
मोफत जेवण दिलं नाही म्हणून हॉटेल कर्मचाऱ्याला मारहाण; अखेर ‘तो’ पोलीस अधिकारी निलंबित
NMC Scam | स्टेशनरी घोटाळा : साकोरे कुटुंबीयांना 40 वर्षांपासून कंत्राट; पाच नव्हे सात कंपन्या!
नाशिक हादरले! किरकोळ वादातून तरुणाची हत्या; आरोपींना पोलिसांनी घेतले ताब्यात