पती आणि सासरच्यांचा पाळीव कुत्रा घराबाहेर काढण्यास नकार, महिलेने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल
महिलेला श्वासोच्छवासाचा त्रास होत होता. तिला कुत्र्यांची अॅलर्जी होती. डॉक्टरांनी तिला कुत्र्यांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता.
बंगळुरु : प्रत्येक घरात दररोज कोणत्या ना कोणत्या कारणाने भांडणे, वाद होत असतात. कधी भांडणे तात्पुरती असतात तर कधी गंभीर वळण घेतात. भांडणाची कारणे अनेक असतात. मात्र पाळीव कुत्रा (Pet Dog) हे वादाचे आणि आत्महत्येचे कारण ठरल्याचे ऐकले आहे का ? बंगळुरुत ही घटना प्रत्यक्ष घडली आहे. पती (Husband) आणि सासू घरातील पाळीव कुत्रा बाहेर काढण्यास तयार नव्हते म्हणून महिलेने आपल्या 13 वर्षाच्या मुलीसह स्वतःचे जीवन संपवल्याची (Killed Herself) धक्कादायक घटना बंगळुरुत घडली आहे.
महिलेला श्वसनाचा त्रास होता
महिलेला श्वासोच्छवासाचा त्रास होत होता. तिला कुत्र्यांची अॅलर्जी होती. डॉक्टरांनी तिला कुत्र्यांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे तिने पती व सासरच्या मंडळींना घरातील पाळीव कुत्रा बाहेर काढण्यास सांगितले. पण त्यांनी नकार दिला.
घरातील कुत्र्यामुळे तिच्या प्रकृतीवर कोणताही परिणाम होणार नाही, असे पती व सासू-सासऱ्यांनी सांगितले.
घरच्यांनी ऐकले नाही म्हणून महिलेने स्वतःसह मुलीला संपवले
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेचे म्हणणे ऐकून न घेतल्याने ती तिच्या खोलीत गेली आणि बराच वेळ बाहेर आली नाही. त्यानंतर कुटुंबीयांनी खोलीचे दार उघडले असता महिलेने तिच्या मुलीसह आत्महत्या केल्याचे दिसले.
दिव्या असे आत्महत्या करणाऱ्या 36 वर्षीय महिलेचे नाव आहे. दिव्या ही हाऊसवाईफ होती तर तिची मुलगी सहावीत शिकत होती.
पती, सासू-सासऱ्यांविरोधात गुन्हा दाखल
या प्रकरणी पोलिसांनी पती श्रीनिवास, सासू वसंता आणि सासरा जनार्दन यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या सर्वांविरुद्ध गोविंदपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिव्याच्या वडिलांनी पोलिसांनी तक्रारीत म्हटले आहे की, या प्रकरणावरून त्यांची मुलगी आणि सासरच्या लोकांमध्ये वाद झाला होता. त्यानंतर तिने हे पाऊल उचलले.