20 रुपयांचा वाद, 7 लोकांनी मिळून घातला त्याच्या हत्येचा घाट, ट्रेनखाली आल्यानं चिंधड्या
मोतीगंज येथील एका पानाच्या दुकानात सोमवारी रात्री 22 वर्षीय सलीम खान गेला. त्याने दुकानातून तंबाखू मसाला खरेदी केला. यानंतर 20 रुपयांवरुन सलीम आणि दुकानदारामध्ये वादावादी सुरु झाली.
इटावा : केवळ 20 रुपयांवरुन झालेल्या वादातून एका 22 वर्षाच्या तरुणाला बेदम मारहाण करुन रेल्वे ट्रॅकवर फेकून त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील इटावा येथे उघडकीस आली आहे. सलीम खान असे मयत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सात लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व आरोपी फरार असून, पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
20 रुपयांवरुन झाला वाद
मोतीगंज येथील एका पानाच्या दुकानात सोमवारी रात्री 22 वर्षीय सलीम खान गेला. त्याने दुकानातून तंबाखू मसाला खरेदी केला. यानंतर 20 रुपयांवरुन सलीम आणि दुकानदारामध्ये वादावादी सुरु झाली.
मारहाणीनंतर रेल्वे ट्रॅकवर फेकले
वाद इतका टोकाला गेला की दुकानातील अन्य सात जणांनी मिळून सलीमला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाण केल्यानंतर जखमी अवस्थेत सलीमला रेल्वे ट्रॅकवर फेकले.
ट्रॅकवर टाकल्यानंतर एक सुपरफास्ट ट्रेन सलीमच्या अंगावरुन गेल्याने सलीमचा मृ्त्यू झाला. यानंतर आरोपी फरार झाले आहेत. तेथे उपस्थित अन्य लोकांनी या घटनेची माहिती पोलीस आणि सलीमच्या नातेवाईकांना दिली.
मयताच्या नातेवाईकांकडून गोंधळ
घटनेची माहिती मिळताच तरुणाच्या नातेवाईकांनी रेल्वे ट्रॅकजवळ पोहचत मृतदेहाचे तुकडे एकत्र गोळा केले. त्यानंतर मृतदेह रस्त्यावर ठेवून नातेवाईकांनी गोंधळ घातला. त्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करुन नातेवाईकांना शांत केले.
पोलिसांकडून सात जणांविरोधात गुन्हा दाखल
नातेवाईकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सर्व फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. प्रकरणाचा तपास सुरु असून, लवकरच सर्व आरोपींना अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.