Nashik News : पहिल्यांदा हवेत गोळीबार केला, दुसऱ्यांना नेम धरला पण गडबड झाली, पळून गेलेले आरोपी पोलिसांच्या ताब्यात
nashik crime news : वाहन देवाण घेवणीच्या वादातून गोळीबार करणाऱ्या युवकाला पोलिसांनी घेतले ताब्यात
नाशिक : वाहन देवाण घेवणीच्या वादातून नाशिकच्या (nashik crime news) इंदिरानगर (indira nagar) बोगदा परिसरात मित्राकडूनच मित्राला जीवे ठार मारण्याची धमकी देत गोळीबार केल्याची घटना घडली आहे. याबाबत नाशिकच्या मुंबई नाका पोलिसांत तिघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल असून घटनेतील फरार असलेल्या मुख्य संशयिताला पोलिसांनी (nashik police) बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून गुन्ह्यातील देशी बनावटीचे पिस्टल देखील जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी सांगितली आहे. नेमका वाद कशामुळे झाला, याची पोलिस चौकशी करीत आहेत.
3 दिवसांसाठी त्याच्याकडील स्विफ्ट कार वापरण्यासाठी…
फिर्यादी अविनाश टिळे याने त्याचा मित्र सुनील चोरमारे याला काही दिवसांपूर्वी 2 लाख रुपये उसने दिले होते. त्यांनतर 31 डिसेंबर 2022 या दिवशी टिळे याने सुनीलकडून 3 दिवसांसाठी त्याच्याकडील स्विफ्ट कार वापरण्यासाठी घेतली. त्यांनतर काही कारणात्सव अविनाश टिळे याला स्विफ्ट कार ही सुनील याला देणे शक्य झाले नाही. त्यामुळे 4 जानेवारी2023 रोजी रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास अविनाश हा त्याच्या चौघामित्रांसोबत सुनील चोरमारे याला स्विफ्ट कार देण्यासाठी इंदिरानगर बोगदा परिसरात आला.
पण बंदुकीतून फायर झाले नाही…
त्यावेळी संशयित सुनील चोरमारे, जगगु सांगळे, राज जोशी हे देखील त्याठिकाणी आले आणि सुनील याने त्याच्या खिशातून देशी बनावटीच्या पिस्तूल मधून हवेत गोळीबार केला. जीवे ठार मारण्याची धमकी देत अविनाशच्या दिशेने पुन्हा गोळीबार करण्यासाठी बंदूक ताणली. मात्र बंदुकीतून गोळी फायर न झाल्याने घाबरलेल्या अविनाश आणि त्याच्या मित्रांनी तेथून पळ काढत पोलिसांत धाव घेतली.
गुन्ह्यात वापरलेले देशी बनावटीचे पिस्तूल देखील जप्त
त्या दिवसापासून या घटनेतील मुख्य संशयित सुनील चोरमारे हा अद्याप पर्यंत फरार होता. मुंबई नाका पोलिसांना चोरमारे हा राणेनगर जवळलील हॉटेल एम्पायर हॉटेल या ठिकाणी येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून या घटनेतील मुख्य संशयित आरोपी सुनील चोरमारे याला अटक केली असून, त्याकडून गुन्ह्यात वापरलेले देशी बनावटीचे पिस्तूल देखील जप्त करण्यात आल्याच्या माहिती पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी दिली.