पूर्ववैमनस्यातून महाविद्यालयीन तरुणाला संपवले, भररस्त्यात घडलेल्या घटनेने सांगली हादरली
या हल्ल्यात अजितचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर त्याला येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. त्यावेळी त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
सांगली / शंकर देवकुळे (प्रतिनिधी) : सांगली (Sangli) जिल्ह्यातील कर्नाळ रस्ता परिसरातील म्हसोबा मंदिराजवळ राहणाऱ्या महाविद्यालयीन युवकाची निर्घृण हत्या (Murder) केल्याची घटना घडली आहे. अजित बाबुराव अंगडगिरी असे मयत युवकाचे नाव आहे. खुनाची घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. जुन्या वादातून (Old Dispute) ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी तिघे आरोपी संशयित आहेत. रात्री उशीरापर्यंत कुणालाही ताब्यात घेतले नव्हते.
पदवीच्या पहिल्या वर्षात शिकत होता तरुण
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित अंगडगिरी हा कर्नाळ रस्त्यावरील एका गार्डनजवळ राहत होता. तो शहरातील एका महाविद्यालयात विद्या शाखेत पहिल्या वर्षाचे शिक्षण घेत होता. तसेच त्याला फोटोग्राफीचाही छंद होता. त्याच्या वडिलांची घराजवळच पानपट्टी आहे.
शेतात काम करत असताना आरोपींनी बोलावून घेतले
पद्माळे फाटा परिसरातून माधवनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर शेत करण्यासाठी घेतले होते. अजित हा आज शेतात औषध टाकण्याचे काम करत होता. त्यावेळी त्याचे कुटुंबियही शेतातच होते. आज सायंकाळच्या सुमारास तिघे तरूण दुचाकीवरून आले.
पानपट्टीत अजितविषयी माहिती घेतली. त्यावेळी तो शेतात असल्याचे माहिती मिळाली. तिघे तरूण तिकडे गेले. अजित याला बोलावून घेतले. त्यावेळी तिघा तरूणातील एकाने अजितवर वार केला आणि त्यानंतर तिघेही पळून गेले.
दरम्यान, या हल्ल्यात अजितचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर त्याला येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. त्यावेळी त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. रात्री उशीरापर्यंत उत्तरीय तपासणी करण्यात आली नव्हती.
पोलिसांकडून पुढील कारवाई सुरु
शहर पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथकाने घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार तत्काळ तपासाची सुत्रे फिरवली. पुर्वीच्या भांडणातून हा खून झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवला जातोय.