शंभरहून अधिक गुन्हेगारांवर MPDA अंतर्गत कारवाई केल्यानंतरही नांदेडात गुन्हेगारीवर आळा बसण्याऐवजी गुन्हेगारी वाढत चालली आहे. गुन्हेगारी रोखण्यात पोलीस दल कमी ठरत असल्याने नांदेड शहरात मागील चार दिवसात खुनाच्या तीन घटना घडल्या आहेत. या घटनांमुळे पोलीस दलाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तर दुसरीकडे शहरवासीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र सध्या नांदेडमध्ये दिसत आहे. नांदेडमध्ये गेल्या चार दिवसांपासून खुनांची मालिका सुरूच आहे. नांदेड शहराच्या ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीमध्ये चार दिवसांत तीन खुनांच्या घटना घडल्या आहेत.
या तिन्ही गुन्ह्यांमध्ये तीक्ष्ण हत्याराने भोसकून खून केल्याचे समोर आले आहे. या खुनाच्या घटनांमुळे नांदेडमध्ये खळबळ उडाली आहे. नांदेडमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. देशी कट्टे, तलवार, खंजर अशी हत्यारे तर सर्रासपणे विक्री होत असल्याचं समोर येत आहे. पोलिसांकडून दिवसाआड शस्त्रे जप्त करण्याची करवाई केली जाते. पण ही शस्त्रे कुठून येतात? यांच्यामुळापर्यंत पोलीस जात नसल्याचं या घटनांवरून लक्षात येतंय.
नांदेड शहरातील ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत झालेल्या खुनाच्या तिन्ही घटनांतील आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहेत. या खुनाच्या घटनांमध्ये कारणं वेगवेगळी असली तरी यातील आरोपी आणि फिर्यादी हे गुन्हेगारी प्रवृत्तीची असल्याचे समोर आले आहे. नांदेडच्या या खुनी मालिकांनंतर पोलीस अधिक्षक यांनी शहरातील गुन्हेगारांवर MPDA अंतर्गत करवाई करणार असल्याचं सांगितलं आहे.
नांदेड शहरालगत असलेल्या ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत सलग तीन दिवस खुनाच्या घटना घडल्या आहेत. पहिला खून झाल्यानंतर क्राईम ब्रँच आणि गोपनीयशाखेकडून रेकॉर्डवरिल आरोपींवर कारवाई करणे अपेक्षित होते. पण असे झाले नाही. अंतर्गत वादातूनच खुनाच्या घटना घडत असून एकमेकांना संपवण्याचं सत्रच सुरू झाले आहे. यावर वेळीच आळा घालणं अपेक्षित आहे. अन्यथा नांदेडमध्ये गुन्हेगारांच्या टोळ्या निर्माण होण्याची शक्यता आहे.