नदीत कपडे धुवायला गेलेल्या मायलेकासह तिघांचा मृत्यू, परिसरात हळहळ
नदीवर उन्हाळ्यात कपडे धुण्यासाठी आईबरोबर मदतीला गेलेल्या सतरा वर्षांच्या मुला आणि त्याच्या आईचा, अन्य एका महिलेचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर बघ्यांची एकच गर्दी उसळली आहे.

शहापूर शहराजवळील वाफे हद्दीतील भातसा नदीकाठी कपडे धुण्यासाठी गेलेल्या मायलेकांसह तिघांचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार चेरपोली गावातील मायलेक आणि आणखी एक महिला कपडे धुण्यासाठी भातसा नदीवर गेल्या होत्या. अचानक त्यांचा पाय घसरुन त्या नदी पडल्या. त्यांना पोहता येत नसल्याने तिघांचाही मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार शहापूर शहराजवळील वाफे हद्दीतील भातसा नदीकाठी दुपारच्या सुमारास लक्ष्मी दत्तात्रय पाटील ( ५० रा.चेरपोली ) आणि त्यांचा १७ वर्षांचा मुलगा धीरज दत्तात्रय पाटील आणि आणखी एक महिला वनिता सुदर्शन शेळके (वय 33 रा.वाफे ) हे नदीवर कपडे धुवायला गेले होते. त्यावेळी आधी कोण बुडाले हे नेमके समजलेले नाही, परंतू त्यांचा पाय घसरुन हे तिघे जण बुडाल्याचे म्हटले जात आहे. या घटनेने शहापूर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.




तोल गेल्याने पाण्यात पडले
या घटनेची माहिती मिळताच शहापूर पोलीस घटनास्थळी पोहचले. शहापूरमधील जीवरक्षक टीम सदस्यांनी आणि स्थानिक ग्रामस्थांनी तिघांच्या मृतदेहांना पाण्याबाहेर काढले. उपजिल्हा रूग्णालय शहापूर येथे शव विच्छेदनासाठी त्यांना पाठविण्यात आले आहे. पुढील तपास शहापूर पोलिस करत आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.