Video : बसल्या जागीच ठार! चालत्या ट्रेनमध्ये खिडकीतून रॉड घुसून जेव्हा प्रवाशाच्या आरपार जातो…
काळ आला होता आणि वेळही आली होती! रेल्वे प्रवाशासोबत घडलेली दुर्दैवी घटना नेमकी काय?
उत्तर प्रदेश : मृत्यू कुणालाही कुठेही, कधीही आणि अगदी कसाही गाठू शकतो, हे अधोरेखित करणारी घटना समोर आली आहे. दिल्ली-कानपूर निलांचल एक्स्प्रेसमधून एक प्रवासी जात होता. या प्रवासादरम्यान, अचानक खिडकीतून एक लोखंडी रॉड रेल्वे डब्ब्यात घुसला. खिडकीजवळच बसलेल्या 32 वर्षीय तरुणीच्या मानेतून आरपार हा रॉड गेला आणि बसल्या जागीच तरुणाचा जीव गेला. या घटनेनं रेल्वेतील इतर प्रवासीही प्रचंड घाबरले होते. फक्त तरुणाच्या मानेलाच नव्हे तर डब्यातील पत्र्यालाही छेद देऊन हा रॉड आत घुसला होता.
12876 क्रमांकाच्या निलांचल एक्स्प्रेसमध्ये ही दुर्दैवी घटना घडली. दीड इंच जाडीचा आणि पाच फूट लांबीचा लोखंडी रॉडने एका तरुण रेल्वे प्रवाशाचा जीव घेतला. या रेल्वे प्रवाशाचं नाव हरीकेश कुमार दुबे असं आहे. या दुर्घटनेत तरुण जागीच ठार झाला.
शुक्रवारी सकाळी 8.45 मिनिटांनी ही घटना घडली. निलांचन एक्स्प्रेस धनवार आणि सोमना रेल्वे स्थानकाच्या दरम्यान होती. धावत्या ट्रेनमध्ये अचानक रॉड घुसल्यानं तरुणाला जीव वाचवण्यासाठी क्षणाचाही वेळ मिळाला नाही आणि त्याच्यावर जागीच काळाने घाला घातला.
नेमका हा रॉड खिडकीतून ट्रेनच्या डब्ब्यात घुसलाच कसा, असा सवालही आता उपस्थित केला जातो आहे. याप्रकरणी अधिक तपास केला जातो आहे. मृत 32 वर्षीय तरुण हा जनरल डब्यातून प्रवास करत होता, त्यावेळी ही दुर्घटना घडली. यानंतर 9.23 वाजता ही ट्रेन अलिगड जंक्शन इथं थांबवण्यात आली. त्यानंतर पुढील तपास करण्यात आला.
पाहा व्हिडीओ :
Freak accident on board #Delhi–#Kanpur #NeelachalExpress: Man dies after being impaled by an iron rod that broke through a glass window and struck him in the neck pic.twitter.com/uIybUTed3m
— Siraj Noorani (@sirajnoorani) December 2, 2022
दरम्यान, या दुर्घटनेत एका पेक्षा जास्त जणांचाही जीव जाण्याचा धोका होता. कारण हा रॉड फक्त तरुणाच्या मानेतून आरपार गेला नाही. तर ट्रेनच्या आत प्रवाशांच्या कंपार्टमेन्टमधील पत्र्याला छेड देऊन आरपार गेला होता. त्यामुळे इतर प्रवाशांनाही तो लागण्याची भीती होती. पण इतर प्रवासी या घटनेतून अगदी थोडक्यात बचावलेत. या घटनेप्रकरणी पोलिसांनी कलम 304 अन्वये गुन्हा नोंदवून घेत पुढील तपास सुरु केला आहे.
मृत झालेल्या तरुणाच्या पश्चात पत्नी आणि दोन मुलं आहे. या तरुणाच्या अपघाती मृत्यूने त्याची पत्नी, 7 वर्षांची एक मुलगी आणि चार वर्षांचा मुलगा पोरका झाला आहे. हे कुटुंबीय दिल्लीत गेल्या आठ वर्षांपासून राहत होते. कोरोनामध्ये नोकरी गेल्यानंतर हा तरुण नुकताच एका खासगी कंपनीत टॉवर टेकनिशिअन म्हणून कामाला लागला होता. या तरुणाच्या मृ्त्यूने त्याच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरलीय.