Mumbai Crime : आधी ज्येष्ठ नागरिकांशी गोड बोलून गुंतवायचे, नंतर त्यांना लुटून फरार व्हायचे, दोन भामट्यांना अखेर अटक
ज्येष्ठ नागरिकांना बोलण्यात गुंतवून हातचलाखी करत त्यांना लुटणाऱ्या दुकलीला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. वसई-विरार परिसरासह अनेक ठिकाणच्या नागरिकांना हे दोघे लूटायचे.

मुंबई | 5 सप्टेंबर 2023 : ज्येष्ठ नागरिकांशी गप्पा मारत, त्यांना बोलण्यात गुंतवत हातचलाखी करून त्यांच्याकडील पैसे, मोबाईल, रोख रक्कम असा ऐवज लुटणाऱ्या (crime news)दोन भामट्यांना अखेर पोलिसांनी अटक (arrested) केली आहे. मुंबई, ठाणे, मीरा भाईंदर, वसई विरार, या परिसरात हे दोन्ही गुन्हेगार राजेरोसपणे फिरायचे आणि त्यांचा कार्यभाग साधायचे. अखेर त्यांना विरारमध्ये अटक करण्यात आलीआहे. आरोपींचा सर्व कारनामा सीसीटीव्ही मध्ये देखील कैद झाला आहे.
विरार क्राईम ब्रँच टीम 03 चे प्रभारी पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख यांच्या पथकाने ही कारवाई करत ज्येष्ठ नागरिकांना लुटणाऱ्या भामट्यांना विरारमधून अटक केली आहे. रमेश उर्फ रम्या विजयकुमार जैस्वाल (वय 46), आणि विशाल उर्फ बल्या उर्फ बाळू विष्णू कश्यप (वय 28) असे अटक केलेल्या दोन्ही आरोपींची नावं आहेत. ते दोघेही चेंबूर आणि धारावी परिसरातील रहिवासी आहेत. त्यांच्यावर ५० हून अधिक गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. या दोनही आरोपींकडून आत्तापर्यंत सुमारे 10 लाख रुपये किमतीचे 166 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि चोरीचा इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
विविध ठिकाणी गुन्हे आहेत दाखल
या दोनही आरोपींविरोधात विरार, वसई माणिकपूर, ठाणे शहर मधील मध्यवर्ती आणि महात्मा फुले पोलीस ठाणे, मुंबई शहर मधील बोरिवली, मालाड, दिंडोशी या पोलीस ठाण्यात 8 गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासून पोलिसांच्या विविध पथकांनी त्यांचा कसून शोध घेतला आणि अटक केली.