Dawood Ibrahim | लग्न सोहळ्यात दाऊदच्या नातेवाईकाची गोळ्या झाडून हत्या
Dawood Ibrahim | एका लग्न सोहळ्यात दाऊदच्या जवळच्या नातेवाईकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. बुधवारी रात्री निहाल आणि कमीलची जोरदार वादावादी झाली. त्यानंतर कमीलने त्याची बंदुक काढली व पाहुण्यांसमोर निहालची गोळ्या झाडून हत्या केली.
शहाजहाँपूर | अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या एका नातेवाईकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. निहाल खान असं मृत व्यक्तीच नाव आहे. एका लग्न समारंभारत गोळ्या झाडून निहाल खानची हत्या करण्यात आली. निहाल खान मुंबईला राहतो. लग्नासाठी म्हणून तो उत्तर प्रदेशला गेला होता. त्यावेळी शहाजहाँपूर जिल्ह्यात जलालाबाद येथे निहालची हत्या करण्यात आली. निहालच्या मानेत गोळ्या लागल्या. निहाल खान दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरचा मेहुणा आहे. इक्बाल कासकर मुंबईत राहतो. निहालची बहिण रिझवाना हसनच इक्बाल कासकरशी लग्न झालय.
2018 सालच्या खंडणीच्या एका प्रकरणात इक्बाल कासकर तळोजा मध्यवर्ती कारागृहात बंद आहे. जलालाबाद शहराचे चेअरमन शकील खान हे सुद्धा निहालचे मेहुणे होते. 2016 साली निहाल शकीलच्या पुतणी बरोबर पळून गेला होता. 15 दिवसानंतर ती सापडली. या प्रकरणात तडजोड झाली. कुठलीही कायदेशीर कारवाई झाली नाही.
का हत्या केली?
“15 फेब्रुवारीला निहालच विमान चुकलं. तो रस्ते मार्गाने इथे आला. 2016 च्या घटनेमुळे माझा भाऊ कमील निहालवर नाराज होता. त्याच्या मनात बदल्याची भावना होती. माझ्या मुलाच्या लग्नाच्या रिसेप्शनला निहाल आल्याच समजल्यानंतर कमील बंदुक घेऊन आला. कमील संधीच्या शोधात होता. लग्न सोहळ्याच्या चौथ्या दिवशी संधी मिळताच त्याने निहालची हत्या केली” असं शकीलने सांगितलं.
पोलिसांनी काय सांगितलं?
या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्याने सांगितलं की, “बुधवारी रात्री निहाल आणि कमीलची जोरदार वादावादी झाली. त्यानंतर कमीलने त्याची बंदुक काढली व पाहुण्यांसमोर निहालची गोळ्या झाडून हत्या केली. आरोपी घटनास्थळावरुन पसार झाला आहे”
SSP ने काय सांगितलं?
“निहालची पत्नी रुखसारच्या तक्रारीवरुन आम्ही कमील खान विरोधात IPC च्या कलम 302 अंतर्गत एफआयर नोंदवला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवलाय. सर्व बाजूंनी प्रकरणाचा तपास होतोय. आरोपीला लवकरच अटक होईल” अशी माहिती शहाजहाँपूरचे एसएसपी अशोक कुमार मीना यांनी दिली.