लखनौ : उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमध्ये वहिनीची चाकूने वार करुन हत्या केल्याच्या आरोपाखाली दीराला अटक करण्यात आली आहे. मुरादाबाद शहर पोलीस अधीक्षक अमित कुमार आनंद यांनी याविषयी माहिती दिली. कटघर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी इम्रानची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.
काय आहे प्रकरण?
शनिवारी संध्याकाळी इम्रानने त्याची वहिनी प्रवीणची चाकूने भोसकून हत्या केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून चौकशी सुरू आहे, असं पोलीस अधीक्षक अमित कुमार आनंद यांनी सांगितलं. मृत विवाहिता प्रवीणचे पती परवेज यांनी सांगितले की, जेव्हा ही घटना घडली तेव्हा कुटुंबातील सदस्य तळ मजल्यावर नमाज पठण करत होते. तर त्यांची पत्नी प्रवीण पहिल्या मजल्यावर होती. 37 वर्षीय महिला चार मुलांची आई होती.
वाराणसीत डॉक्टर वहिनीची दीराकडून हत्या
दरम्यान, डॉक्टर वहिनीचे सततचे टोमणे ऐकून बेजार झालेल्या दीराने तिची हत्या केल्याची घटना काही महिन्यांपूर्वी समोर आली होती. हातोडी आणि कात्रीने वार करत दीराने डॉक्टर विवाहितेला तिच्या क्लिनिकमध्ये जाऊनच संपवलं होतं. उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. डॉ. सपना गुप्ता-दत्ता यांच्या हत्येनंतर आरोपी दीर अनिल दत्ताने पोलिसात आत्मसमर्पण केलं होतं.
नेमकं काय घडलं होतं?
उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये सिगरा पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या महमूरगंज भागात ही घटना घडली होती. रघुवर कॉलनीत असलेल्या डॉक्टर वहिनीच्या क्लिनिकमध्ये जाऊनच दीराने तिचा जीव घेतला होता. आपल्याला मूल होत नव्हतं, म्हणून डॉक्टर वहिनी सातत्याने टोमणे मारायची. चारचौघात त्यावरुन पाणउतारा करायची. त्यामुळे वहिनीविषयी मनात राग साठला होता, असा दावा आरोपीने केला होता.
हातोडी आणि कात्रीने डोक्यात वार
वहिनीचं क्लिनिक बंगल्याच्या तळ मजल्यावर होतं, तर आरोपीचे आई-वडील तिथेच वरच्या मजल्यावर राहतात. त्यांना भेटण्याच्या निमित्ताने आल्यावर वहिनी टोमणे मारायची. बुधवारीही तिने आपल्यासोबत आपल्या भावाविषयी आक्षेपार्ह उद्गार काढले. त्यामुळे हातोडी आणि कात्रीने डोक्यात वार करुन आपण तिची हत्या केली, अशी कबुली आरोपीने दिली आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत महिलेला रुग्णालयात नेले होते, परंतु डॉक्टरांनी तिला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले होते. पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेज पाहून तपासाला सुरुवात केली होती. हत्येसाठी वापरलेला हातोडा आणि कात्रीही पोलिसांनी जप्त केले होते.
वहिनी-दीरामध्ये कौटुंबिक वाद
डॉ. सपना गुप्ता-दत्ता ही वाराणसीत दत्ता डायग्नॉस्टिक सेंटर चालवत होती. तिचे पतीही डॉक्टर असून त्यांना दोन मुली आहेत. सासरेही डॉक्टर असून त्यांच्या नावे बँकेत मोठी रक्कम जमा असल्याची माहिती समोर आली आहे. यावरुनच वहिनी-दीरामध्ये काही दिवसांपासून कौटुंबिक वाद सुरु असल्याचं बोललं जातं.
संबंधित बातम्या :
दिरासोबत राहण्यासाठी आधी पतीची हत्या, आता वहिनीने त्याच दिराचाही जीव घेतला