पत्नीच्या रोमँटिक गाण्यामुळे पोटच्या तीन मुलांना मारलं, भाजप नेत्याचा संसार उद्धवस्त, धक्कादायक माहिती उघड
भाजप नेता योगेश रोहिलाने पोटच्या तीन मुलांना संपवलं. एक-एक करुन त्याने तीन मुलांवर गोळीबार केला. चौघांवर गोळी झाडल्यानंतर योगेश रोहिला आरामात बसला होता. त्याने स्वत: पोलिसांना या घटनेबद्दल सांगितलं. पत्नी गुणगुणत असलेल्या एका रोमँटिक गाण्यावरुन हे सर्व सुरु झालं. त्याच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे.

एक हादरवून सोडणारी घटना समोर आली आहे. भाजप नेता योगेश रोहिलाने आपल्याच मुलांची हत्या केली. योगेश रोहिलाने आधी पत्नीवर गोळ्या झाडल्या त्यानंतर एक-एक करुन त्याने तीन मुलांवर गोळीबार केला. पत्नी नेहा, मुलगा देवांशस शिवांश आणि मुलगी श्रद्धा यांच्यावर गोळ्या चालवल्या. या घटनेत तिन्ही मुलांचा मृत्यू झाला आहे. पत्नीवर चंदीगडच्या पीजीआय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. उत्तर प्रदेशच्या सहारनपुरमध्ये सांगठेडा गावात ही धक्कादायक घटना घडली. योगेश रोहिलाला त्याच्या पत्नीवर संशय होता.
पोलीस चौकशीत योगेश रोहिलाने सांगितलं की, त्याला त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. त्याला माहिती मिळालेली की, पत्नी नेहाच बाहेर कुठल्यातरी युवकासोबत अफेयर सुरु आहे. अनेकदा यावरुन दोघांमध्ये भांडण झालेलं. त्याने पत्नीला मारहाण सुद्धा केलेली. याच गोष्टीवरुन तो मागच्या काही दिवसांपासून तणावाखाली होता. शनिवारी जेव्हा तो घरी होता, तेव्हा पत्नी एक रोमँटिक गाण गुणगुणत होती. त्याच गाण्यावरुन योगेश आणि नेहामध्ये भांडण सुरु झालं.
त्यांनी हे सर्व पाहिलं
भांडणानंतर काही वेळाने योगेश साडेबाराच्या सुमारास तिन्ही मुलांना श्रद्धा, देवांश आणि शिवांशला शाळेतून घरी घेऊन आला. घरी आल्यावर त्याने पत्नीसोबत भांडण सुरु केलं. योगेश नेहावर इतका चिडला की, त्याने आपल्या लायसन्स रिव्हॉलव्हरमधून नेहाच्या डोक्यात गोळी झाडली. गोळी लागल्यानंतर नेहा जमिनीवर पडली. खोलीत योगेशची तिन्ही मुलं होती. त्यांनी हे सर्व पाहिलं. योगेशच्या डोक्यात राग धुमसत होता. पत्नीवर गोळी चालवल्यानंतर त्याने श्रद्धावर बंदूक रोखून गोळी झाडली. श्रद्धानंतर त्याने देवांश आणि शिवांशवर गोळी झाडली.
मुलांना का मारलं?
चौघांवर गोळी झाडल्यानंतर योगेश रोहिलाने स्वत: पोलिसांना या घटनेबद्दल सांगितलं. पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांनी योगेश रोहिलाला अटक करुन त्याची पिस्तुल ताब्यात घेतली. योगेशने पोलीस चौकशीत सांगितलं की, पत्नीला गोळी मारल्यानंतर पुढे मुलांच काय होणार? म्हणून त्याने मुलांना सुद्धा गोळी मारली. कुटुंबियांना मारल्यानंतर त्याने स्वत:वर गोळी चालवण्याचा विचार केला. पण त्याला आत्महत्या करण्याची भिती वाटली.