लखनऊ : राजकीय नेत्यांकडे सर्वसामान्य माणसं आशा, अपेक्षेने पाहतात. आपल्याला न्याय मिळवून देण्यात, योग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यात राजकीय नेते यशस्वी होतील, अशी आशा बाळगली जाते. राजकीय नेत्यांचं काम जातपात, धर्माच्या सर्व भींती ओलांडून सामाजिक कार्यात सर्वश्रेष्ठ ठरावं, अशी सर्वसामान्यांची इच्छा असते. राजकीय नेते ज्या कुटुंबातून येतात त्या कुटुंबाची देखील जबाबदारी वाढते. आपल्या वागणुकीने नेत्याची प्रतिमा मलीन होणार नाही, याची जबाबदारी खरंतर प्रत्येक नेत्याच्या कुटुंबावर असते. जवळपास सर्वच कुटुंबांकडून याबाबत काळजी घेतली जाते. पण काही ठिकाणी या गोष्टी अपवादात्मक असतात. उत्तर प्रदेशच्या उन्नाव येथे घडलेली एक संतापजनक घटना याच गोष्टीचं ताजं उदाहरण आहे. एका भाजप नेत्याच्या भावांनी एका दाम्पत्याला प्रचंड अमानुषपणे मारहाण केल्याचं उघड झालं आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
उत्तर प्रदेशच्या उन्नाव येथून भाजप नेत्याच्या भावांची गुंडगिरी समोर आली आहे. संबंधित भाजप नेत्याच्या भावांनी एका दाम्पत्याला आपल्या घरी बोलावलं होतं. पण दाम्पत्य गेलं नाही म्हणून त्यांना प्रचंड मारहाण करण्यात आली. भाजप नेत्याचे भावंडं दाम्पत्याच्या घरी गेले आणि त्यांनी प्रचंड हिंसाचार केला. त्यांनी आपल्या साथीदारांसह दाम्पत्याला अमानुषपणे मारहाण केली. आरोपींनी पुरुषाला लाठ्या-काठ्यांनी मारलं. यावेळी जीव वाचवण्यासाठी पीडित व्यक्ती पळत होता. पण आरोपींना त्याची दया आली नाही. त्यांनी त्याचा पाठलाग करत त्याला पकडत मारहाण केली. विशेष म्हणजे आरोपी इतके निष्ठूर होते की त्यांनी महिलेलादेखील मारहाण केली. आपल्या पतीला मारहाण होताना बघून त्याची पत्नी त्याला वाचवण्यासाठी पुढे धावली. पण आरोपींनी महिलेला देखील मारहाण केली. संबंधित प्रकार कॅमेऱ्यात कैद झालाय. या घटनेमुळे संपूर्ण उन्नावमध्ये खळबळ उडाली आहे. एका राजकीय नेत्याच्या भावांकडून असं अमानुष कृत्य घडल्याने संपूर्ण जिल्ह्यातून या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात येतोय. आरोपींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी आता होऊ लागली आहे.
या घटनेत महिला आणि पुरुष दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या नवाबगंज सार्वजनिक आरोग्य केंद्रात उपचार सुरु आहेत. पीडित दाम्पत्याच्या मुलाच्या तक्रारीनंतर संबंधित घटनेप्रकरणी आरोपींवर अजगैन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हिडीओत आरोपी महिला आणि पुरुषाला अमानुषपणे मारहाण करत असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. तसेच आरोपींकडून दाम्पत्याला आर्वाच्य भाषेत शिवीगाळ देखील करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मारहाण करणारे गुंड हे भाजप नेते रवि सिंह यांचा भाऊ भाई लाला सिंह आणि त्याचे सहकारी होते. रवि सिंह नवाबगंजमध्ये विभागप्रमुख आहेत. त्यांचा तेथील स्थानिक राजकारणात चांगला दबदबा आहे. त्यांच्या राजकीय वर्चस्वाचा फायदा घेऊन त्यांच्या भावाकडून परिसरात गुंडगिरी केली जात असल्याचा आरोप करण्यात येतोय. विशेष म्हणजे या आरोपांचा ठोस पुरावा देखील समोर आला आहे. अर्थात आम्ही या व्हिडीओची पुष्ठी करत नाहीत. पण या व्हिडीओत रवि सिंह यांचा भाऊ दाम्पत्याला मारहाण करताना दिसत असल्याचा दावा केला जातोय.
संबंधित घटना घडत असताना गावकऱ्यांची मोठी गर्दी जमा झाली होती. यावेळी एकाने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात ही घटना कैद केली होती. दरम्यान, या घटनेनंतर पीडित दाम्पत्याच्या मुलाने न्याय मिळावा यासाठी पोलिसांना विनंती केली. पोलिसांनी याप्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. या प्रकरणी पोलिसांचा पुढील तपास सुरु आहे.