Manipur Violence : हिंसाचारात धगधगणाऱ्या मणिपूरमध्ये पुन्हा घडली हादरवून सोडणारी धक्कादायक घटना
Manipur Violence : मागच्या वर्षभरापासून मणिपूर धगधगत आहे. तिथे हिंसाचार अजूनही थांबलेला नाही. आता पुन्हा एकदा मणिपूरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे.
मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार सुरु झाला आहे. जिरीबाम येथे सशस्त्र गटांमध्ये झालेल्या गोळीबारात 5 जणांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, जिरीबाम येथे आज सकाळी (7 सप्टेंबर) ताज्या हिंसाचारात 5 लोकांचा मृत्यू झाला. पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, एका व्यक्तीची झोपलेला असताना गोळी झाडून हत्या करण्यात आली. दोन सशस्त्र विरोधी गटांनी परस्परांवर गोळ्या चालवल्या. यात 4 जणांचा मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बंडखोरांनी जिल्ह्या मुख्यालयापासून 5 किमी अंतरावर एका निर्जन स्थळी एकट्या राहणाऱ्या व्यक्तीची घरात घुसून हत्या केली. त्यावेळी तो झोपलेला होता. या हत्येनंतर 7 किलोमीटर दूर डोंगरांमध्ये सशस्त्र गटात जोरदार गोळीबार झाला. यात 4 जणांचा मृत्यू झाला.
शांततेचा करार झाल्यानंतर पुन्हा हिंसाचार
या आठवड्याच्या सुरुवातीला जाळपोळीची सुद्धा घटना घडली होती. काही लोकांनी एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच रिकामी असलेलं 3 खोल्यांच घर जाळलं होतं. 1 ऑगस्टला आसाच्या कछारमध्ये CRPF च्या देखरेखीखाली एक बैठक झाली. दोन वेगवेगळ्या समुदायाच्या प्रतिनिधींनी सामान्य स्थिती बहाल करण्यासाठी जाळपोळ, गोळीबार रोखण्यासाठी करार केला. त्यानंतर पुन्हा एकदा हिंसाचार झालाय.
हिंसाचारात आतापर्यंत किती लोकांचा मृत्यू?
मागच्यावर्षी मे महिन्यापासून आतापर्यंत इम्फाळ खोऱ्यातील मैतेई आणि आणि आसपासच्या डोंगराळ भागात राहणाऱ्या कुकी, अन्य समुदायात जातीय हिंसाचार झाला. त्यात आतापर्यंत 200 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला असून हजारो लोक बेघर झाले आहेत.